संपामुळे भाज्या कडाडणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

ठाणे - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक देऊन कृषी उत्पादनाची विक्री करण्यास नकार दिल्यामुळे ठाणे शहरात भाज्यांच्या दरवाढीचे संकट घोंगावू लागले आहे. पहिल्या दिवशी भाजीपाल्यांच्या पुरवठ्यावर २५ टक्के परिणाम झाल्याचे दिसले. ठाणे शहरातील महत्त्वाच्या भाजी मंडयांमध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात माल आला असला, तरी बुधवारी रात्री उशिरा पाठवण्यात आलेल्या शेतमालाचा यात समावेश होता.

ठाणे - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक देऊन कृषी उत्पादनाची विक्री करण्यास नकार दिल्यामुळे ठाणे शहरात भाज्यांच्या दरवाढीचे संकट घोंगावू लागले आहे. पहिल्या दिवशी भाजीपाल्यांच्या पुरवठ्यावर २५ टक्के परिणाम झाल्याचे दिसले. ठाणे शहरातील महत्त्वाच्या भाजी मंडयांमध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात माल आला असला, तरी बुधवारी रात्री उशिरा पाठवण्यात आलेल्या शेतमालाचा यात समावेश होता. गुरुवारी दिवसभर आवक बंद झाली असून पुढील दिवसांतही शेतमाल येणार नसल्याने व्यापाऱ्यांकडून कृत्रिम दरवाढीची शक्‍यता निर्माण झाल्याचे ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. जांभळी नाका, गावदेवी आणि अन्य भागातील भाजी विक्रेत्यांकडे कमी माल आल्याचे सांगण्यात येत होते; तर उद्यापासून आवक पूर्णपणे बंद होणार असल्यामुळे भाज्यांचे भाव वाढण्याची शक्‍यता आहे.

ठाणे शहराला भाजीपाला पुरवणाऱ्या शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून शेतमालाचे ट्रक शहरांकडे पाठवण्यास नकार दिला असून यामुळे शहरांकडे येणारी आवक पूर्णपणे बंद झाली आहे. शेतमाल घेऊन येणाऱ्या ट्रक आणि टेम्पोची नासधूस होण्याची शक्‍यता तसेच नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर भाजीपाला पाठवण्यास नकार दिला. पहिल्या दिवशी शहरातील मंडयांमधील व्यवहार चालू होता. अनेक व्यापाऱ्यांनी चांगला माल आल्याचे सांगितले; तर किरकोळ व्यापाऱ्यांनीही गुरुवारी मोठी खरेदी करून साठवणूक करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारपासून आंदोलन पेटल्यास मालाची आवक घटून किमती वाढण्याची शक्‍यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत २५ टक्के घट 
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज येणाऱ्या मालात २५ टक्‍क्‍यांची घट दिसून आली. ३१ मे रोजी ९ हजार ९१२ क्विंटल शेतमाल आल्याची नोंद होती; परंतु १ जूनला आलेला माल घटून ७ हजार ७६५ इतका असल्याचे दिसले. गुरुवारी सकाळी ४५ ट्रक आणि ७९ टेम्पोमधून शेतमाल कल्याणमध्ये आला. त्यात भाजीपाल्याचे १६ ट्रक आणि ६२ टेम्पोमधून २ हजार ९८५ माल आला होता, तर ६ टेम्पोतून १६० क्विंटल पालेभाजी आली होती. कांदा-बटाट्यात १८ ट्रक आणि ५ टेम्पोमधून ३ हजार ५३ क्विंटल माल आला, तर चार टेम्पोमधून ७० क्विंटल फळे बाजारात आली. अन्नधान्याच्या ११ ट्रकांमधून १ हजार २९७ क्विंटल धान्यांची आवक झाल्याची माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली. 

महागाईची टांगती तलवार...
आवक कमी झाल्यामुळे शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या शेतमालाची साठेबाजी करून विक्री केली जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शुक्रवारपासून शहरात भाववाढ होण्याची शक्‍यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

Web Title: thane news vegetables farmerstrike