घोडबंदरमध्ये मुसळधार पावसानं घेतला पहिला बळी, ठाण्यातही अतिवृष्टीचा इशारा

पूजा विचारे
Tuesday, 4 August 2020

या पावसानं ठाण्यात पहिला बळी घेतला आहे. घोडबंदर रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मुंबईः मुंबईप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. ठाण्यात घोडबंदर येथे पाणी साचल्याने या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. अशातच या पावसानं ठाण्यात पहिला बळी घेतला आहे. घोडबंदर रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

विजेच्या पोलचा धक्का लागून या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा हनुमान मंदिराजवळ हा प्रकार दुर्देवी प्रकार घडला. या ठिकाणी रस्त्यावरील विद्युत खांबामध्ये अचानक वीज प्रवाह उतरला होता. खांबाला स्पर्श झाल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप या मृत व्यक्तीची ओळख पटली नसून या व्यक्तीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

हेही वाचाः  Mumbai Rain Alert: पुढचे ३ तास धोक्याचे,नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान घोडबंदर रोड येथील तुळशी धाम येथे झाडं आणि विद्युत पोल कोसळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवसाथपन आणि अग्निशमन दलाचे जवान रवाना झालेत.

अधिक वाचाः मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसाचा तडाखा, अर्धे टिळकनगर पाण्याखाली...

दुसरीकडे येणाऱ्या ४८ तासात मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने रेड अॅलर्ट जारी केला असून नागरिकांना गरज नसताना घराच्याबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे.

Thane one man died due electric shock Heavy rain Update


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane one man died due electric shock Heavy rain Update