कल्याणमध्ये रिक्षांसाठी ठाणे पॅटर्न! 

रवींद्र खरात
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर सॅटिस पुलाखाली रांगेत उभे राहून प्रवाशांना रिक्षातून प्रवास करणे सोयीचे ठरत आहे. याच धर्तीवर कल्याण रेल्वेस्थानक परिसरात रिक्षा चालक-प्रवासी वाद टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हाच "ठाणे पॅटर्न' राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सायंकाळच्या सुमारास प्रवाशांनी रांगा लावून रिक्षा पकडायच्या असून, रिक्षाचालकांनी सीट मिळताच मार्गस्थ व्हायचे आहे. सध्या या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत असून, हा प्रयोग दिवसभर राबवावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. 

कल्याण : ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर सॅटिस पुलाखाली रांगेत उभे राहून प्रवाशांना रिक्षातून प्रवास करणे सोयीचे ठरत आहे. याच धर्तीवर कल्याण रेल्वेस्थानक परिसरात रिक्षा चालक-प्रवासी वाद टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हाच "ठाणे पॅटर्न' राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सायंकाळच्या सुमारास प्रवाशांनी रांगा लावून रिक्षा पकडायच्या असून, रिक्षाचालकांनी सीट मिळताच मार्गस्थ व्हायचे आहे. सध्या या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत असून, हा प्रयोग दिवसभर राबवावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. 

कल्याण रेल्वेस्थानकाबाहेर कल्याण अंतर्गत, उल्हासनगर, डोंबिवली, भिवंडी, कल्याण पूर्व आदी परिसरात जाण्यासाठी विविध रिक्षा स्टॅंड आहेत. नियम धाब्यावर बसवत रिक्षाचालक रस्त्यावर रिक्षा लावून तीनहून अधिक प्रवासी घेतात. अनेक वेळा रिक्षांच्या अस्ताव्यस्त रांगांमुळे स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांच्या नाकीनऊ येतात. वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी स्थानक परिसरात सायंकाळी रांगेतून प्रवासी घेण्याचा प्रयोग सुरू केला आहे.
 
वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त दत्तात्रय निघोट, पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी पहिल्या टप्प्यात कल्याणमधील खडकपाडा, बेतूरकर पाडा, लालचौकी, आधारवाडी चौक, टिळक चौक आदी परिसरात जाणाऱ्या रिक्षा स्टॅंडमध्ये जाऊन रिक्षाचालकांनी रांगेत येणारे प्रत्येकी 3 प्रवासी घेऊन पुढे जायचे आणि प्रवासी वर्गानेही रांगेत येऊन रिक्षा पकडायची आहे. रिक्षाचालकाने वाढीव भाडे अथवा हुज्जत घातल्यास वाहतूक विभागाच्या हेल्पलाईनवर तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

शहरातील रिक्षाचालकांविरोधात येणाऱ्या तक्रारींमुळे "ठाणे पटर्न' कल्याण स्टेशन परिसरामध्ये राबवित आहोत. जादा प्रवासी वाहतूक टाळून प्रवाशांनी रांगेतूनच रिक्षा पकडावी. काही तक्रार असल्यास ठाणे वाहतूक पोलिसांच्या 8286400400 हेल्पलाईन नंबरवर तक्रार करा. 
- दत्तात्रय निघोट, 
सहायक पोलिस आयुक्त 
वाहतूक विभाग  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane Pattern for Raksha in Kalyan!