'अब तक 21' चा लागला छडा, नागरिकांचा जीव भांड्यात..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 December 2019

  • ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई..

ठाणे : मिराभाईंदर, काशिमिरा आणि पालघर भागात घरफोडी करून हैदोस घालणाऱ्या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी खास CCTV चे जाळे विणून शिताफीने अटक केली आहे. राजेंद्र पटेल (37) आणि रोहीत रेशीम (30) अशी अटक चोरट्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून 21 घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावून 36 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. यात 1 किलो सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

धक्कादायक : फ्लॅट दाखवण्याच्या नावाने अमृता घेऊन जायची आणि ..

दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटना

मागील काही महिन्यांपासून मिरा-भाईंदर येथील इमारतींमध्ये दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटना घडत होत्या. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या पथकाने याप्रकरणांचा तपास सुरू केला.

सुरुवातीला पोलिसांनी ज्या इमारतींमध्ये घरफोडी झाली, तेथील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासले असता एक तरुण इमारतीच्या आवारातून बॅग घेऊन जाताना दिसत होता. पुढे हा तरुण रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असल्याचे रस्त्यांवरील फुटेजमध्ये आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी पश्‍चिम रेल्वे स्थानकातील सर्व सीसी टीव्ही कॅमेरे तपासले असता हा संशयित तरुण अंधेरी रेल्वे स्थानकात उतरून पूर्वेकडील दिशेला गायब होत असल्याचे निदर्शनास आले.

महत्त्वाची बातमी : घर नंबर-506 आणि चॉकलेटी रंगाची पिशवी

घरफोडीची हत्यारे जप्त

स्थानकाच्या सीसी टीव्हीमध्ये स्थानकातून बाहेर पाडल्यानंतर पुढे तो कुठे जात होता, याचा तपास पोलिसांना लागत नव्हता. अखेर डिसेंबर महिन्यात पोलिसांनी अंधेरी पूर्वेकडील एका इमारतीमध्ये सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सीसी टीव्ही कॅमेरे बसवले. तसेच, दोन कर्मचारी त्या परिसरात पाळतीवर ठेवले. 

17 डिसेंबरला या इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा तरुण कैद झाला. अंधेरी स्थानकातून पायी चालत जाताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राजेंद्र पटेल असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या बॅगेतून घरफोडीची हत्यारे जप्त केली. पोलिस चौकशीत त्याने आपला साथिदार रोहीत रेशीम याचा ठावठिकाणा सांगताच त्यालाही ताब्यात घेतले.

धक्कादायक : ...म्हणून त्या महिलेला कपडे बदलताना बाहेर काढले

1 किलो सोन्याचे दागिने जप्त

पटेल बेरोजगार असून रोहीत हा गॅरेजमध्ये काम करतो. त्याच्याकडे असलेल्या एका जुन्या कारमधून त्यांनी चोरलेले 1 किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. हे दोघेही सोनारांकडे सोने गहाण ठेऊन सोनारांकडून पैसे घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

WebTitle : thane police arrested duo from mumbai involved in house burglary


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane police arrested duo from mumbai involved in house burglary