लघुशंकेच्या बहाण्याने आरोपीची ठाणे पोलीसांच्या हातावर तुरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

ठाणे : शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक असलेल्या आरोपीला नालासोपारा येथून ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नेत असताना लघु शंकेचा बहाणा करून या आरोपीने पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. देवेंद्र बाबल्या माळी (24) असे फरार आरोपीचे नाव असून नालासोपारा येथील नाळगांव पढई येथील राहणारा होता. वसई न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर ठाणे मध्यवर्ती तुरूंगात नेण्यासाठी शासकिय वाहन उपलब्ध नसल्यामुळे टीएमटी बसने प्रवास करून पोलीस शिपाई त्याला ठाण्याच्या दिशेने घेऊन चालले होते. परंतु माजीवडा बस स्टाॅपवर गाडी बदलत असताना लघुशंकेचा बहाणा करून त्याने पलायन केल्याचे स्पष्ट झाले.

ठाणे : शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक असलेल्या आरोपीला नालासोपारा येथून ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नेत असताना लघु शंकेचा बहाणा करून या आरोपीने पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. देवेंद्र बाबल्या माळी (24) असे फरार आरोपीचे नाव असून नालासोपारा येथील नाळगांव पढई येथील राहणारा होता. वसई न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर ठाणे मध्यवर्ती तुरूंगात नेण्यासाठी शासकिय वाहन उपलब्ध नसल्यामुळे टीएमटी बसने प्रवास करून पोलीस शिपाई त्याला ठाण्याच्या दिशेने घेऊन चालले होते. परंतु माजीवडा बस स्टाॅपवर गाडी बदलत असताना लघुशंकेचा बहाणा करून त्याने पलायन केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वसईतील नालासोपारा पोलीस ठाण्यात देवेंद्र बाबल्या माळी याला अटक करण्यात आले होते. शस्त्र बाळगल्या प्रकरणी त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वे गुन्हा दाखल आहे. त्याला सोमवारी दुपारी वसई न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी करून त्याला मध्यवर्ती न्यायालयात सोपवण्याचा आदेश येथील पोलीसांना देण्यात आला होता. त्यानुसार पोलीस नाईक आनंदा खोत आणि पोलीस शिपाई शिवाजी लोखंडे त्याला घेऊन ठाण्याच्या दिशेने निघाले होते. रात्री सव्वा आठ वाजता त्यांनी नालासोपारा ते ठाणे पुर्व अशी बसमधून प्रवास सुरू केला होता. माजिवडा येथून बस हायवेमार्गे ठाणे पुर्वेकडे जाणार असल्यामुळे आरोपीला घेऊन घेऊन हे पोलीस कर्मचारी माजिवडा बस थांब्यावर पावणे बारा वाजण्याच्या सुमारास उतरून दुसऱ्या बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी आरोपीने लघुशंकेचा बहाणा केला. एका कर्मचाऱ्याने त्याला धरून ठेवले होते. परंतु उताराच्या दिशेला असल्या या दोन्ही कर्मचाऱ्यांना खाली ढकलून आरोपीने तेथून पलायन केले. 

Web Title: Thane police esakal news