
ठाणे- एलटीटी स्थानकावर अंध प्रवाशांसाठी आता ब्रेल लिपी!
मुंबई : दिव्यांग प्रवाशांच्या रेल्वे प्रवास सुरक्षित आणि आरामदायी व्हावा याकरिता मध्य रेल्वेकडून अनेक उपायोजना करण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणजे ठाणे आणि लोकमान्य टिळकर टर्मिनसवर अंध प्रवाशांना परावलंबित्व कमी करण्यासाठी ब्रेल लिपीची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे अंध प्रवाशांना मोठा दिलास मिळणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर अंध प्रवाशांसाठी ब्रेल लिपीची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. जिना, लिफ्ट, पादचारी पूल, विश्राम गृह, महत्वाची कार्यालये, बसण्याची आसने, पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी, स्थानकाचा नकाशा, फलाटांची माहिती ब्रेल लिपीत देण्यात आली आहेत.
त्यामुळे अंध प्रवाशांना इच्छित स्थान शोधण्यासाठी याची मदत होणार आहे, याशिवाय दृष्टिहीन प्रवाशांसाठी सर्व प्लॅटफॉर्मच्या काठावर चेकर टाइल्ससह मार्गदर्शक मार्ग/पथ तयार करण्यात आला आहे. तसेच दिव्यांगजन कोच कोठे येतो हे दर्शविणाऱ्या प्लॅटफॉर्मवर चेकर्ड टाइल्स देखील टाकण्यात आल्या आहेत आणि सर्व उपनगरीय स्थानकांवर दिव्यांगजन कोचचे स्थान ओळखण्यासाठी बीपरसह चिन्हे देखील प्रदान करण्यात आली आहेत. दिव्यांगजन प्रवाशांना सहज प्रवेश/बाहेर पडण्यासाठी सर्व उपनगरीय स्थानकांवर (बेट प्लॅटफॉर्म वगळता) रॅम्प प्रदान केले आहेत. सर्व उपनगरीय स्थानकांवर स्टेनलेस स्टील रेलिंगसह एस्केलेटर आणि एफओबी देखील प्रदान केले आहेत.
तिकिटांचे बुकिंग सुलभ करण्यासाठी, सर्व उपनगरीय स्थानकांवर कमी उंचीचे बुकिंग काउंटर प्रदान करण्यात आले आहेत. याशिवाय, दिव्यांगजन प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी सुविधा देणार्यांच्या सेवांचाही लाभ घेता येईल. सर्व उपनगरीय स्थानकांवर दिव्यांगजन अनुकूल शौचालये आणि कमी उंचीच्या पिण्याच्या पाण्याचे नळ उपलब्ध करून देण्यात आले आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
Web Title: Thane Railway Provides Station Information In Braille Script For Blind Passengers Ltt Station Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..