esakal | ठाणे : कारवाईआधीच फेरीवाले पसार
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

ठाणे : कारवाईआधीच फेरीवाले पसार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे (Thane) पालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर अखेर आजपासून प्रशासन फेरीवाल्यांचा (peddlers) ‘बाजार’ उठवण्यासाठी फिल्डवर उतरली; मात्र पालिका (Municipal) पथक कारवाईसाठी येणार असल्याची ‘सूचना’ खबऱ्यांकडून आधीच मिळाल्यामुळे शहरातून फेरीवाले पसार झाले.

ठाणे (Thane) स्थानकापासून (Station) शहरातील अनेक रस्ते कारवाईच्या भीतीने ‘फेरीवालेमुक्त’‘(Free from peddlers) झाल्याचा अनुभव खुद्द पालिकेच्या पथकाला आला. त्यामुळे पोलिस (Police) व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन कारवाईसाठी आलेल्या पथकाने रस्ते, पदपथावर पथारी पसरलेल्या टपऱ्या, हातगाड्यांवर हातोडा मारत ‘मिशन साफसफाई’चा शुभारंभ केला.

गेल्या महिन्याभरापासून ठाणे महापालिकेने सुरू केलेला बेकायदा बांधकामविरोधी मोर्चा फेरीवाल्यांच्या दिशेने वळवला आहे. यातूनच सोमवारी माजिवाडा प्रभाग समितीमध्ये कारवाईदरम्यान पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना फेरीवाल्याचा जीवघेणा सामना करावा लागला. दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला, पण त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली. या धक्कादायक घटनेनंतर ठाणे महापालिकेने अनधिकृत फेरीवालाविरोधी मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तुरळक कारवाई नको, तर संपूर्ण शहर फेरीवालामुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिक्रमण निष्कासन विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला असून त्याची सुरुवात माजिवाडा-मानपाडा आणि नौपाडा प्रभागापासून झाली आहे.

हेही वाचा: ठाणे जिल्हा रुग्णालय "Bronze" पुरस्काराने सन्मानित

ठाणे स्थानक परिसर समाविष्ट असलेल्या नौपाडा आणि मानपाडा-माजिवाडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक फेरीवाले आहेत. त्यामुळे मोहिमेची सुरुवात या प्रभागांमधून झाली. ठरल्याप्रमाणे पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि कारवाईची वाहने असा फौजफाटा घेऊन पथक सकाळपासून कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. माजिवाड्यातील ढोकाळीपासून या मोहिमेला सुरुवात झाली. वास्तविक अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याच्या घटनेपासूनच कारवाईची टांगती तलवार फेरीवाल्यांवर होती.

त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहरात अचानक फेरीवाल्यांची संख्या कमी झाली. त्यात आज कारवाई होणार याची ‘टीप’ आधीच मिळाल्याने या दोन्ही प्रभागातील फेरीवाले ‘गायब’ झाल्याचे दिसून आले. मात्र पदपथावरच्या रिकाम्या टपऱ्या, बाकडे तशीच होती. त्यामुळे पथकाने त्यावर हातोडा मारण्यास सुरुवात केली. सायंकाळपर्यंत शेकडो टपऱ्यांचा या पथकाने चक्काचूर केला.

हेही वाचा: पुणे : आंबेगावमध्ये अनाधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

‘हद्द’ ओलांडू नका!

शहरातील अनेक दुकानदारांनी पदपथ अडवले आहेत. दुकानातील सामान रस्त्यांवर ठेवल्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे दुकानाच्या बाहेर सामान लावून पदपथ अडवणाऱ्या दुकानदारांनाही या वेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी समज दिली. यापुढे ‘हद्द’ ओलांडली, तर सामान जप्त करून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

अ‍ॅक्शन प्लॅन

१) ठाणे पालिकेच्या नऊ प्रभागांमध्ये एकाच वेळी कारवाई न करता टप्प्या-टप्प्याने शहर फेरीवाला मुक्त करण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॉन’ तयार करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

२) प्रत्येक प्रभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची चार पथके तयार करण्यात आली आहे. ज्या प्रभागात कारवाई होणार त्या ठिकाणी इतर प्रभागातील कर्मचाऱ्यांची जादा कुमक घेण्यात आली आहे.

३) माजिवडा आणि नौपाडा येथील कारवाईसाठी उथळसर व वर्तकनगर येथील पालिका कर्मचारी मदतीला आहेत. कारवाईच्या ठिकाणी किमान ४० पोलिसांचा फौजफाटा असणार आहे. याशिवाय पालिकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा ताफाही तैनात राहणार आहे. तसेच कारवाईनंतर पुन्हा फेरीवाले बसू नयेत, यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.

loading image
go to top