ठाणे जिल्हा परिषदेवर पुन्हा भगवा; अध्यक्षपदी लोणे, तर उपाध्यक्षपदी पवार 

राहुल क्षीरसागर
Wednesday, 15 July 2020

शिवसेना व भाजपच्या पक्षश्रेष्ठींमध्ये झालेल्या चर्चेनंतर भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचा वरचष्मा दिसून आला. या निवडणुकीत भाजपने तटस्थ भूमिका घेतल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कल्याण गटातील सुषमा लोणे तर, उपाध्यक्षपदी सुभाष पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे पुन्हा ठाणे जिल्हा परिषदेत सर्वपक्षीय सत्तेचा पॅटर्न दिसून आला आहे. 

मोठी बातमी : २६ जुलैपासून सुरु होणार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, 'असे' आहेत प्रवेशासाठीचे तीन टप्पे

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 15 जुलैला संपुष्टात आल्याने या दोन्ही पदांसाठी बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी शिवसेनेच्यावतीने अध्यक्ष पदासाठी कल्याण तालुक्यातील खडवली-नडगाव गटाच्या सुषमा लोणे यांनी तर, उपाध्यक्ष पदासाठी मुरबाड तालुक्यातील सुभाष पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडूनही अध्यक्षपदासाठी रेश्मा मगर तर, उपाध्यक्ष पदासाठी कैलास जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा रंगली होती. 

संकटांना आवरा हो ! कोरोनासोबत मलेरियाच्या वाढत्या रुग्णांनी पालिकेची चिंता वाढवली

मात्र, शिवसेना व भाजपच्या पक्षश्रेष्ठींमध्ये झालेल्या चर्चेनंतर भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. यावेळी ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. तर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे हे देखील यावेळी उपस्थित होते.

उल्हासनगरातही 'धारावी पॅटर्न' राबवण्याचा निर्णय; पालिका आयुक्तांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकप्रतिनिधींशी संवाद

उपाध्यक्षांवर पुन्हा जबाबदारी
ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपची सत्ता आहे. त्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने अध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण जाहीर झाले. यामुळे अध्यक्षपदासाठी सुषमा लोणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, यापूर्वी उपाध्यक्ष असलेल्या सुभाष पवार यांच्यावर पुन्हा पक्षाने उपाध्यक्षपदाची जबाबदारी देत, त्यांचा देखील अर्ज दाखल केला. विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सुषमा लोणे यांची अध्यक्ष तर, सुभाष पवार यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली.

मुंबई-ठाण्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

जिल्ह्याच्या शहरी-ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासावर अधिक लक्ष देणार आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी व ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होणार नाही याकडे विशेष लक्ष केंद्रित करणार असून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 
-सुषमा लोणे, नवनिर्वाचित अध्यक्ष, जिल्हा परिषद, ठाणे.

---

संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane zp election, sushama lone elected as chairman and subhash pawar as deputy chairman