टकटक टोळीने ठाणेकर हैराण

टकटक टोळीने ठाणेकर हैराण

ठाणे : सिग्नलला अथवा वाहतूक कोंडीत उभ्या असलेल्या कारच्या काचेवर "टकटक' करून वाहनचालकाच्या नकळत मुद्देमाल लांबवणाऱ्या टोळीने ठाण्यात उच्छाद मांडला आहे. मंगळवारी (ता. 24) दोघा कारचालकांना या "टकटक टोळी'ने हात दाखवल्याच्या दोन विविध घटना पूर्व द्रुतगती महामार्गावर घडल्या. याप्रकरणी नौपाडा आणि कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

घोडबंदर येथील हाईड पार्क परिसरात राहणारे अमित राघवन (33) हे मंगळवारी रात्री कारने घरी जात होते. तीनहात नाका उड्डाणपुलावरून नाशिकच्या दिशेने जात असताना वाहतूक कोंडी लागली. याचदरम्यान एका व्यक्तीने त्यांच्या कारवर टकटक करून कारची काच खाली घेण्यास भाग पाडून, कार व्यवस्थित चालवण्याची समज दिली. त्याच वेळी कारच्या दुसऱ्या बाजूकडील काचेवर अन्य एका व्यक्तीने "टकटक' करून राघवन यांना कारची काच खाली घ्यावयास लावली. त्यानंतर संधी साधून पहिल्या भामट्याने राघवन यांचे लक्ष विचलित करून कारमधील मोबाईल आणि पाकीट चोरी केले. वाहतूक कोंडीतून पुढे गेल्यावर लूट झाल्याचे राघवन यांच्या लक्षात आले. तोपर्यंत भामटे पसार झाले होते. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसरी घटना कापूरबावडी नाक्‍यावरील माजिवडा बस थांब्यावर घडली. हिरानंदानी इस्टेट येथे राहणाऱ्या 59 वर्षीय महिला मंगळवारी दुपारी 11.45 च्या सुमारास मॉलमध्ये खरेदीसाठी कारने निघाल्या होत्या. तेव्हा कारच्या काचेवर टकटक करून दोघा भामट्यांनी महिलेचे लक्ष विचलित करून गाडीतील महागडा 89 हजारांचा ऍपलचा मोबाईल लांबवला. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

कारवाईनंतर टोळी पुन्हा सक्रिय 
ठाण्यात यापूर्वीही टकटक टोळीने उच्छाद मांडला होता. सिग्नलवर असे प्रकार सातत्याने घडत होते. तेव्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही काळ हा प्रकार बंद झाला होता; मात्र एकाच दिवशी दोन घटना घडल्याने टकटक टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या टोळीचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com