धुक्‍याच्या दुलईत हरवले ठाणेकर

ठाणे : शांत वारा आणि धुक्‍याची दाट चादर पांघरलेले शहर असे चित्र रविवारी सकाळी ठाणेकरांना अनुभवायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर सकाळी अचानक धुक्‍याची चादर पसरल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला होता.   (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे : शांत वारा आणि धुक्‍याची दाट चादर पांघरलेले शहर असे चित्र रविवारी सकाळी ठाणेकरांना अनुभवायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर सकाळी अचानक धुक्‍याची चादर पसरल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

ठाणे : अवकाळी पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू असतानाच पुन्हा वातावरणात बदल घडताना दिसून येत आहेत. शुक्रवारी (ता. 8) धुवाधार बरसणाऱ्या पावसाने उघडीप दिल्यानंतर रविवारी उत्तरेकडून वाहणाऱ्या जोरदार थंड वाऱ्यामुळे मुंबई-ठाण्यात धुक्‍याची दुलई पसरली होती. त्यामुळे ठाणेकरांनी गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.

नेहमीच्या उकाड्याच्या रहाटगाडग्यात सध्या ठाणेकर थंड हवेच्या ठिकाणांची अनुभूती घेत आहेत. निसर्गरम्य येऊर-उपवनसारख्या ठिकाणी तर अभूतपूर्व गारवा जाणवत असल्याच्या प्रतिक्रिया मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या. तलावांचे शहर अशी ख्याती असलेल्या ठाणे शहरात नैसर्गिक संपदादेखील विपुल प्रमाणात आहे. 

निसर्गरम्य परिसर असलेला येऊर आणि उपवन तलाव परिसरातील दाट वनराईमुळे तापमानाचा पारा कितीही असला तरी या भागात मात्र नेहमीच थंडावा असतो. शुक्रवारी ठाणे शहराला अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. त्यानंतर दोन दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर रविवारची पहाट ठाणेकरांसाठी धुक्‍याची दुलई घेऊन आली. पहाटेपासून साधारण 8 वाजेपर्यंत संपूर्ण ठाणे शहरात धुकेच धुके पसरले होते. त्यामुळे शहरातील उंचच उंच इमारती आणि महामार्ग दाट धुक्‍यात हरवून गेले. यात वाहनांचा वेगही मंदावला होता.

धुक्‍यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने दुपारपर्यंत ठाण्यात थंडीचा माहोल होता. अनेकांनी पहाटेच्या या धुक्‍याच्या दुलईचा आनंद लुटला. सकाळच्या वेळेत थंडीची अनुभूती असली तरी दुपारनंतर मात्र उष्मा जाणवला. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार रविवारी ठाण्याचा पारा किमान 33.98 आणि कमाल 34.68 अंश सेल्सिअस इतका होता. 

वातावरणातील बदलाबाबत आश्‍चर्य 
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तापमानाची नोंद ठेवली जाते. दिवसभरातील तापमानाचा आलेख हा कमाल (दिवसातील सर्वाधिक) व किमान (सर्वांत कमी) तापमानातून कळतो. रविवारी किमान तापमान 34 अंश सेल्सिअसच्या जवळपास असले, तरी हवेत गारवा निर्माण झाला होता. चार दिवसांपूर्वी उच्चांक गाठणारा 33 ते 36 अंशांवरील तापमानाचा पारा होता. त्यामुळे उकाडा वाढला होता. त्यानंतर अचानक शुक्रवारी सकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले; तर पुन्हा रविवारी धुके पसरल्याने वातावरणातील बदलाबाबत नागरिक आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत. दरम्यान, उत्तर-पूर्वेकडून थंड हवा आणि पश्‍चिमेकडून येणारी ऊबदार हवा यांच्या मिश्रणामुळे सध्या ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुक्‍याचे साम्राज्य पसरत असल्याचे हवामान तज्ज्ञ सांगतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com