Mumbai : फोटोअभावी ५७ हजार मतदारांची नावे वगळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Voter List

फोटोअभावी ५७ हजार मतदारांची नावे वगळली

वाशी : कोरोना रुग्‍णांची संख्या घटल्‍याने नवी मुंबई महापालिका निवडणुका पुढील वर्षात होणार आहेत. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी व पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच मतदारबांधणीला सुरुवात केली आहे. नवी मुंबई शहरात येणाऱ्या बेलापूर व ऐरोली या दोन्ही विधासभा मतदारसंघांत फोटो नसलेल्या ५७ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

निवडणूक आयोगाकडून मतदार पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. तत्‍पूर्वी मतदारांनी फोटो दिले नाहीत, तर नवी मुंबईतील फोटो नसलेले आणखी मतदार कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी आपली नावे, फोटो मतदारयादीत आहेत की नाहीत याची खात्री करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. स्थानिक माजी नगरसेवकही प्रभागामध्ये नवीन मतदारांची नोंद करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत सीडीद्वारे मतदार याद्या पाठवण्यात आल्या असून मतदार पुनरिक्षण कार्यक्रम देण्यात आला आहे, परंतु मतदारांना आपल्‍या नावाची खातरजमा करण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान केंद्र असतात, त्या ठिकाणी मतदार याद्या उपलब्ध करून देण्याची मागणी राजकीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ठाणे जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या व मतदार यादीमध्ये नावे आहेत, पण फोटो नसलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे संकट कायम आहे. फोटो नसलेली अनेक नावे नवीन याद्यांमधून कमी करण्यात आली आहेत.

निवडणूक आयोगाने फोटो नसलेल्या लाखो मतदारांच्या याद्या सीडीद्वारे राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांना पाठवल्या असून नवीन मतदार नोंदणी तसेच फोटो नसल्याने नावे वगळलेल्यांची शोधमोहीम करून त्यांची पुन्हा फोटोसह नावे नोंदवता येणार आहेत.

ज्या मतदारांचे छायाचित्र नावासमवेत नाही, त्यांची नावे वगळण्यात येत आहेत. लवकरात लवकर ही छायाचित्रे आणून दिली नाहीत, तर छायाचित्र नसलेल्या अन्य नावेही यादीतून वगळण्यात येतील.

- ज्ञानेश्वर खुटवड,

मतदार नोंदणी अधिकारी, बेलापूर

पुनरिक्षण कार्यक्रमात नावे, फोटो द्या

नवी मुंबई शहरात बेलापूर व ऐरोली हे दोन मतदार संघ आहेत. बेलापूर मतदारसंघातील फोटो नसलेल्या ३७ हजार जणांची नावे वगळण्यात आली आहेत; तर ऐरोली मतदारसंघातील २०,०१५ मतदार वगळण्यात आले आहेत. पाच जानेवारीपूर्वी उर्वरित मतदारांनी छायाचित्र दिले नाही त्‍यांची नावेही वगळण्यात येणार आहेत.

loading image
go to top