झोपड्यांमुळे नौदल तळाला धोका

झोपड्यांमुळे नौदल तळाला धोका

मुंबई - कुलाबा येथील नेव्हीनगर परिसरातील झोपड्यांची संख्या वाढत असल्यामुळे ‘आयएनएस शिक्रा’ या नौदलाच्या तळाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) सर्वेक्षण करून झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घेणार आहे. परंतु, नौदल तळाची सुरक्षा आणि किनारा नियमन क्षेत्र (सीआरझेड) कायद्याचे निर्बंध अशा कात्रीत सापडल्यामुळे या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

नेव्हीनगर परिसरातील गीतानगर, आझादनगर आणि सुंदरनगर या झोपडपट्ट्या काही वर्षांत विस्तारल्या आहेत. त्यामुळे ‘आयएनएस शिक्रा’ तळाला धोका निर्माण झाल्याने या झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याची शिफारस नौदलाने राज्य सरकारला गेल्या वर्षी केली होती. त्यानुसार एसआरएमार्फत बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हे काम लवकरच सुरू होईल.

नौदलाकडून आवश्‍यक परवानग्या राज्य सरकारला मिळाल्यानंतर बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली. राज्य सरकारच्या आदेशानंतर गीतानगर, आझादनगर, सुंदरनगर या भागातील सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत स्थानिकांसह मार्चमध्ये बैठक घेतल्याचे एसआरए अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रश्‍नावलीच्या आधारे झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण केले जाईल, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणूक आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी ही प्राथमिक बैठक झाली होती. आझादनगर आणि सुंदरनगर येथील झोपड्यांना क्रमांक देण्यात आले असून, बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू झाले आहे. नौदलाच्या भूखंडावर वसलेल्या गीतानगर झोपडपट्टीचे सर्वेक्षणही लवकरच हाती घेतले जाईल, असे सांगण्यात आले.

या आहेत अडचणी
हा परिसर महत्त्वाच्या नौदल तळालगत असून, तेथे दुमजली झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या तळावरील हालचाली सहज टिपता येतील, अशी शक्‍यता नौदलाने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद केली आहे. गीतानगर झोपडपट्टी नौदलाच्या जागेवर, तर आझादनगर आणि सुंदरनगर या झोपडपट्ट्या सरकारी जमिनीवर वसल्या आहेत. या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन तेथेच करायचे असल्यास उंच इमारती बांधाव्या लागतील. त्यामुळे पुन्हा नौदल तळाच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होईल. गीतानगरच्या पुनर्वसनाबाबत राज्य सरकार स्वत: निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com