महाराष्ट्रात रोकड टंचाई नाही - रिझर्व्ह बँक

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मुंबई - लग्नसराई आणि सूटीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोकड काढल्याने काही राज्यांमध्ये रोकड टंचाई निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, गुजरात या राज्यांमधील बॅंकांच्या एटीएममध्ये खडखडाट झाला आहे. रोकड व्यवस्थापनासाठी रिझर्व्ह बॅंकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मुंबई आणि महाराष्ट्रात रोकड पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन रिझर्व्ह बॅंकेने केले आहे. 

सर्वसाधारणपणे दरवर्षी एप्रिलमध्ये सूट्यांचा हंगाम असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात रोकड काढतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काही राज्यांमधील रोकड पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने "सकाळ"ला सांगितले. देशभरात चार हजार करन्सी चेस्ट आहेत. या सर्व करन्सी चेस्टचा रिझर्व्ह बॅंकेकडून आढावा सुरू आहे. बॅंकांना सतर्क करण्यात आले असून, जिथे कमी रोकड आहे तिथे तातडीने पुरवठा करण्याचे आदेश बॅंकांना देण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई आणि महाराष्ट्रात रोकड पुरवठा सुरळीत सुरू आहे. बॅंकांना मागणीप्रमाणे कॅश पुरवली जात असल्याने राज्यात टंचाई नाही, असे या बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

रोकड वाहतूक आणि व्यवस्थापनातील अडचणींमुळे काही शहरांमध्ये टंचाई झाली आहे. रोकड व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांनाही तात्काळ एटीएममध्ये रोकड भरणा करण्याबाबत बॅंकांना सूचित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या दोन ते तीन दिवसांत रोकड टंचाई दूर होईल, असे त्यांनी सांगितले. एटीएममध्ये कॅश नसल्यास ग्राहकांनी शाखेत जाऊन पैसे काढावेत, असे आवाहन रिझर्व्ह बॅंकेने केले. 

अर्थमंत्र्यांनी घेतला आढावा 
काही राज्यांमध्ये रोकड टंचाई निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा नोटाबंदीसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. रोकड टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रोकड उपलब्धतेचा आढावा घेतला. सध्या बाजारात आणि बॅंकांकडे पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध असल्याचे जेटली यांनी म्हटले आहे. काही ठिकाणी रोकडला मागणी असून, पुरवठा कमी असल्याचे टंचाईची परिस्थिती उद्‌भवली आहे. रोकड पुरवठ्यावर तात्काळ उपाययोजना केली जाईल, अशी माहिती जेटली यांनी ट्विटद्वारे दिली आहे. 

Web Title: There is no cash Scarcity in Maharashtra