मोखाड्यात शिक्षणाची ऐशीतैशी; दिड वर्षापासून गटशिक्षण अधिकारी नाही

भगवान खैरनार
सोमवार, 2 जुलै 2018

मोखाडा शिक्षण विभागाशी संपर्क केला असता या रिक्त पदांबाबत वरीष्ठ कार्यालयाला वेळोवेळी माहिती दिली जात असते तसेच ही रिक्त पदेही वरीष्ट पातळीवर वरुनच भरली जातात असे सांगण्यात आले.

मोखाडा - मोखाडा सारख्या दुर्गम तालुक्यात जिल्हा परीषद शिक्षणाची ऐशीतैशी झाल्याचे चित्र असुन, उशिरा भरून लवकर सुटणाऱ्या शाळा नावापुरत्या डिजीटल शाळा झाल्या आहेत. पंचायत समिती शिक्षण विभागात गेली दीड वर्षापासून गटशिक्षण अधिकारी पद रिक्त असून, मुख्याध्यापक, सहशिक्षक आणि पदवीधर शिक्षक अशी मिळुन एकूण 111 पदे रिक्त असल्याचे विदारक चित्र आहे. एकीकडे शिक्षण हक्क कायद्याच्या बाता मारणारे सरकार इथे शिक्षकच द्यायला तयार नसेल तर या कायदयाची अंमलबजावणी पालक आणि विद्यार्थ्यानीच करायची काय? असा सवाल विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे. 
       
प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी शासन सर्व मार्गाने प्रयत्न करीत असल्याचे भासवत आहे. यासाठी संपूर्ण मोफत शिक्षण, शालेय पोषण आहार, मोफत गणवेश, वह्या पुस्तके या विविध योजनांबरोबरच शाळेची गोडी वाढावी म्हणून प्रवेशोत्सव साजरा करणे अशा अनेक योजना राबवित आहे. तर मोखाड्यात असलेली शिक्षण व्यवस्था, दुसरीकडे मात्र स्वतःच शिक्षण हक्काची ऐशीतैशी करत असल्याचे दिसुन येत आहे. तालुक्यात 158 जिल्हा परीषदेच्या शाळा असून यामध्ये मुख्याध्यापक पदे ही 24 मंजूर असताना कार्यरत फक्त 19 असुन 5 रिक्त आहेत. तर पदवीधर शिक्षकांची मंजूर संख्या 104 असताना कार्यरत फक्त 34 आहेत. म्हणजेच तब्बल 70 पदवीधर शिक्षकांची गरज आहे. याशिवाय 382 सहशिक्षकांची गरज असताना उपलब्ध संख्या ही 346 एवढी आहे यामुळे इथेही अजून 36 सह शिक्षकांची गरज आहे. असे एकूण 111 पदे रिक्त आहेत. महत्वाची बाब म्हणजे, तालुक्याची शैक्षणिक व्यवस्था सांभाळणारे, गटशिक्षण अधिकारी हे पद गेली दिड वर्षापासून रिक्त आहे. विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदभार देऊन, शिक्षण विभागाचा कारभार हाकला जात आहे. 
     
अशा या रिक्त पदामुळे तालुक्यात शिक्षण विभागाची धुळधाण झाली असुन दररोज कितीतरी ग्रामस्थ आम्हाला शिक्षक द्या अशी मागणी करीत आहेत. याशिवाय काही शिक्षक केंद्र प्रमुखांच्या दावणीला बांधलेले असतात. तर काहींचे दिवस शिक्षक संघटना आणि राजकारण करण्यातच जास्त जात आहेत. यामुळे केवळ आहे त्यातले फार कमी शिक्षक ईमाने ईतबारे नोकरी करीत असले तरी ही रिक्त पदे तात्काळ भरावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. याबाबत मोखाडा शिक्षण विभागाशी संपर्क केला असता या रिक्त पदांबाबत वरीष्ठ कार्यालयाला वेळोवेळी माहिती दिली जात असते तसेच ही रिक्त पदेही वरीष्ट पातळीवर वरुनच भरली जातात असे सांगण्यात आले.

ज्या जिल्हा परीषद शाळेचा पट 500 च्यावर आहे, अशा शाळेत यावर्षीपासुन 9 वीच्या वर्गाला मान्यता मिळाली आहे. या निकषात तालुक्यातील मोखाडा केंद्र शाळा बसली आहे. मात्र 9 वी म्हटले की सायन्स आले, प्रयोगशाळा आली, असे महत्वाचे विषय असल्याने या ठिकाणी डीएड शिक्षक ऐवजी बीएड तोही बीएससी बीएड अशा शिक्षकांची गरज आहे. मात्र अशा कोणत्याही शिक्षकांची अजून नियुक्ती झाली नसून आहे. त्या उपलब्ध शिक्षकांत काम भागवावे लागत आहे. याशिवाय जर या दर्जाचा शिक्षक तालुक्यात शोधायचा म्हटले तरीही मग आधीच 70 पदवीधर रिक्त असताना इथे शिक्षक आणायचे कुठून असा सवाल कायम आहे. यामुळे वर्ग सुरू केले खरे मात्र शिक्षकाचे काय हा सवाल कायम आहे.

शिक्षक कमी असतांना, बदली झालेले शिक्षक सोडले...
विकल्पा अंतर्गत मोखाड्यातील 26  शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यांना येथुन कार्यमुक्त करण्याची तप्तरता मोखाडा पंचायत समिती ने दाखवली आहे. मुळातच मोखाड्यात शिक्षकांची संख्या कमी असताना , या शिक्षकांना कार्यमुक्त का केले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. येथे बदली झालेल्या शिक्षकांच्या जागी दुसरे शिक्षक हजर झाल्यानंतर च त्यांना कार्यमुक्त करणे अपेक्षित होते, तसा स्थानिक प्रशासनाला अधिकार आहेत. मात्र, तसे न करता बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ सोडण्याची घाई मोखाडा पंचायत समिती ने केली आहे. त्यामुळे यात मोठे अर्थकारण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. 

माझ्याकडे गटशिक्षण अधिकारी पदाचा पदभार येण्यापुर्विच विकल्पातुन बदली झालेल्या शिक्षकांना गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांनी सोडले आहे. या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. - जयश्री पठाणे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, मोखाडा
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: There is no group education officer at mokhada