मुंबईत कोरोना बाधित मनोरुग्णांसाठी वेगळी व्यवस्था नाही, मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

मिलिंद तांबे
Sunday, 13 September 2020

कोरोना बाधित रूग्णांसाठी रूग्णालये, आयसोलेशन सेंटर, कोविड केअर सेंटर मध्ये व्यवस्था जात केली असली तरी बाधित मनोरूग्ण किंवा व्यसनाधिन व्यक्तींसाठी कोणतीही वेगळी व्यवस्था करण्यात आलेली नाही.

मुंबई: कोरोना बाधित रूग्णांसाठी रूग्णालये,आयसोलेशन सेंटर,कोविड केअर सेंटर मध्ये व्यवस्था जात केली असली तरी बाधित मनोरूग्ण किंवा व्यसनाधिन व्यक्तींसाठी कोणतीही वेगळी व्यवस्था करण्यात आलेली नाही. अशा रूग्णांना सर्वसामान्य विभागाच दाखल केल्यास त्या रूग्णांसह इतर रूग्णांनाही त्रास होण्याची शक्यता आहे.  या विशेष व्यक्तींसाठी वेगळी व्यवस्था करण्याचे साकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे घातले आहे.

गेल्या महिन्याभरात मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा कहर वाढला आहे. इमारतींमध्ये देखील रूग्णांची संख्या वाढत असून एकाच घरात कुटूंबातील अनेक सदस्यांना कोरोनाची  लागण होतेय. त्यामुळे  चिंता वाढली असून घरातील एखाद्या मनोरूग्ण, व्यसनाधिन व्यक्ती किंवा विशेष मुलांना जर कोरोना झाला तर करायचे काय असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावू लागला आहे.

गोरेगावमध्ये राहणा-या एका मनोरूग्णाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी अशा रूग्णांसाठी पालिकेने काही वेगळी व्यवस्था केली आहे का याची माहिती घेतली. मात्र अशी वेगळी व्यवस्था नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. मनोरूग्ण, विशेष मुलं,व्यसनाधिन व्यक्ती अशा रूग्णांना उपचारासाठी वेगळ्या व्यवस्थेची गरज असते. शिवाय यांच्यासाठी मानसोपचार तज्ञ,समुपदेशक यांची देखील नितांत आवश्यकता असते. मात्र सध्या तरी अशी व्यवस्था नसल्याचे त्या कुटूंबाला सांगण्यात आले. 

सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पेडामकर यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली असून याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले असल्याचे पेडामकर यांना कळवले आहे. 

अधिक वाचाः  कोविडचा रिकव्हरी रेट घटला, ११ दिवसात २ टक्क्यांनी घट

सध्या पालिका रूग्णालयांतील मानसोपचार तज्ञ तसेच समुपदेशकांना कोविड कामासाठी जुंपले असल्याची माहिती पालिका अधिका-यांनी पेडामकर यांना दिली आहे. याबाबत बोलताना नायर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, अशा रूग्णांसाठी वेगळी व्यवस्था नाही. आपण या रूग्णांना इतर रूग्णांप्रमाणेच दाखल करून उपचार करत आहोत. मात्र अशा रूग्णांची विशेष काळजी पालिका घेत असल्याचे ही ते म्हणाले.

हेही वाचाः  कंगना राणावत आज राज्यपालांची घेणार भेट, वाचा सविस्तर

अशा रूग्णांना सर्वसाधारण विभागात दाखल न करता त्यांना आयसीयू किंवा स्पेशल वॉर्डमध्ये दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केईएम,नायर,सायन सारख्या रूग्णालयांत मानसोपचार तज्ञ उपलब्ध असून या रूग्णालयांत अशा रूग्णांची व्यवस्था केली जाईल.
सुरेश काकाणी , अतिरिक्त आयुक्त , मुंबई महापालिका

-----------------------

(संपादनः पूजा विचारे) 

There is no separate system for corona affected psychiatrists


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no separate system for corona affected psychiatrists