बंदीमुळे थर्माकोल मखरांना फुटले पंख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मुंबई - यंदाच्या गणेशोत्सवासाठी मागील वर्षी ऑक्‍टोबरपासूनच थर्माकोलची मखरे बनवलेल्या व्यावसायिकांची यंदा आलेल्या बंदीमुळे आर्थिक कोंडी झाली आहे. त्यावर मार्ग म्हणून तयार माल आता राज्याबाहेर गोवा आणि गुजरातमधील घाऊक वितरकांकडे पाठवला जात आहे; पण तरीही राज्यभरातील मखर व्यावसायिकांचे ४० ते ५० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.

राज्य सरकारच्या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या थर्माकोल व्यावसायिकांना तिथेही यश आले नाही. त्यामुळे तयार मालाचे करायचे काय, असा पेच त्यांच्यापुढे होता. थर्माकोलला पर्याय म्हणून त्याच व्यावसायिकांनी कार्ड बोर्डचे इको फ्रेंडली मखर बाजारात आणले; पण आमच्या नुकसानाची भरपाई देणार कोण? असा त्यांचा सरकारला सवाल आहे. 

राज्यात थर्माकोलवर बंदी असली तरी सरकारने राज्याबाहेर थर्माकोलची मखरे विकण्यास मुभा दिली आहे. हरदेव आर्टस्‌चे संदेश दबडे दादरमधील वनमाळी हॉलमध्ये अनेक वर्षे थर्माकोलच्या मखरांचे प्रदर्शन भरवून विक्री करीत. त्यांनी आपला तयार माल गोवा आणि गुजरातमधील होलसेल डिलर्सना विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी यंदा थर्माकोलच्या मखरांचे प्रदर्शन भरवले आहे. ते म्हणाले, की ‘आमचे मखर बनवण्याचे काम ऑक्‍टोबर २०१७ मध्येच सुरू झाले. राज्य सरकारने बंदीचा निर्णय मार्चमध्ये दिला. त्यामुळे माझे ३० लाखांचे नुकसान झाले.’ सर्व मखर व्यावसायिकांचे मिळून ४० ते ५० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला.

कार्डबोर्ड मखरांची टंचाई
प्रत्येक मखर व्यावसायिकाचे दीड ते दोन हजार ग्राहक आहेत. सर्वांना यंदा कार्डबोर्डची मखरे पुरवणे शक्‍य नाही. २० टक्के मागणी पूर्ण होईल. थर्माकोलच्या तुलनेत कार्डबोर्ड मखरांची किंमतही जास्त आहे, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.

Web Title: thermocol makhar in mumbai