मुंबईचं पाटणा करून ठेवलंय- फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

आम्ही दोन वर्षांत एवढ्या गोष्टी मुंबईत केल्या. मग गेल्या 30 वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेवर असणाऱ्यांनी नेमकं काय केलं? मुंबईचा कायापालट आम्ही करून दाखवून देऊ अशी मी खात्री देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

मुंबई- "पारदर्शकता हा आमचा फोकस आहे. त्यावर आम्ही भर देणार. विकास हा आमचा अजेंडा आहे. तुमचा भ्रष्टाचार आम्ही सांगत राहणार," असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. 
नागरिकांच्या तक्रार निवारणामध्ये मुंबई आणि पाटणा एकाच स्थानावर आहेत. यांनी मुंबईचे पाटणा करून ठेवले आहे, असा आरोप त्यांनी केला. 

'ही निवडणुकीची सभा आहे. मात्र, काही लोकांना वाटू लागलं आहे की ही मनोरंजनाची सभा आहे. परंतु मी कलगीतुरा करण्यासाठी येथे येत नाही,' असे सांगून फडणवीस म्हणाले, "हैदराबाद हे पारदर्शकतेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे असे वार्षिक पाहणी अहवालामध्ये दाखविण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बंगळूर, तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. मात्र, हाच अहवाल दाखवून, त्याचे फ्लेक्स लावून मुंबई प्रथम क्रमांकावर असल्याचे खोटे दावे शिवसेना करीत आहे." 

मुंबई महापालिकेत मागील सात वर्षांत अंतर्गत लेखापरीक्षणच (इंटर्नल ऑडीट) करण्यात आलेले नाही. केवळ राज्य सरकारचे ऑडीट सक्तीचे असल्यामुळे ते केले. त्याचे केवळ 40 गुण मिळाले, म्हणून तरी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यामध्ये टेंडरचे ऑडीट करण्यात आले नाही. टेंडरबाबत ऑडीट केले असते तर मुंबई पारदर्शकतेत शेवटच्या क्रमांकावर गेली असती, असेही त्यांनी सांगितले.

मुलुंड डम्पिंग ग्राऊंड सुरू ठेवण्यामागे कोणाचं हित दडलं आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा मुद्दा निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

मुंबईकरांचा सर्वाधिक वेळ हा प्रवासामध्ये जातो. मागील 70-80 वर्षांमध्ये 70 लाख लोकांसाठी प्रवासाची सोय झाली आहे. मात्र, आमचं सरकार आल्यापासून मेट्रोचे दोनशे किलोमीटरचे जाळे तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यापैकी 120 किलोमीटरचे काम सुरू केले. त्यामुळे आणखी 70 लाख प्रवाशांची सोय होणार आहे. 

  • मुंबईत मेट्रो, बस, लोकल, मोनो-रेल अशा सर्व प्रवासांसाठी एकच तिकीट उपलब्ध करणार
  • आम्ही मुंबई पहिलं वाय-फाय शहर करून दाखवलं
  • वाहतुकीचं सुसूत्रीकरण करणार
  • समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पूर्ण करू
  • चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारू
  • झोपडपट्टीवासीयांना घरं देऊ
  • सुमद्रातील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न 
Web Title: they have made mumbai like patna