तिसरी आघाडीचा पुन्हा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग पुन्हा होणार आहे. या आघाडीची मोट बांधण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर आणि कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी पुढाकार घेतला आहे. या निवडणुकीत चौरंगी-पंचरंगी लढती झाल्यास तिसरी आघाडी पर्याय ठरेल काय, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग पुन्हा होणार आहे. या आघाडीची मोट बांधण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर आणि कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी पुढाकार घेतला आहे. या निवडणुकीत चौरंगी-पंचरंगी लढती झाल्यास तिसरी आघाडी पर्याय ठरेल काय, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.

या आघाडीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (भाकप), मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण (मार्क्‍सवादी-लेनिनवादी) आणि भारिप बहुजन महासंघाचा समावेश असेल. या आघाडीला यंदा चांगली संधी असल्याचा दावा आघाडीचे नेते करत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना-भाजपमधील वाद सुरू असून, हे पक्ष स्वबळावर लढल्यास मतविभागणी होईल. त्याचा फायदा तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतो, असा विश्‍वास या नेत्यांना वाटत आहे. एकजुटीने लढून अधिकाधिक जागा जिंकण्याचा त्यांचा निर्धार आहे. 

या पक्षांनी आपल्या याद्या तयार केल्या असून, त्यांचे आदानप्रदान केले आहे. आघाडीच्या नेत्यांमध्ये मुंबईतील २२७ जागांसाठी वाटाघाटी सुरू आहेत.

पालिकेच्या मागील काही निवडणुकांमध्येही अशीच आघाडी निर्माण झाली होती. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत गोवंडीतून भारिपचे अरुण कांबळे तर चित्ता कॅम्पमधून खैरनुसा अकबर हुसेन निवडून आल्या होत्या. गेल्या निवडणुकीतील काही घटक पक्ष या आघाडीत नसल्याचे दिसत आहे. रिपब्लिकन पक्षाचे काही गट, समाजवादी पक्ष तसेच जनता दल अद्याप आघाडीत आलेले नाहीत.  

‘अजेंडा सर्वसामान्यांच्या हिताचा’
पाण्याचे समान वाटप, विभागवार आरोग्य केंद्रे, मराठी शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारणे, सामान्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ३७ हजार कोटींच्या अर्थसंकल्पाचा योग्य वापर, मुंबईतून होणारे सामान्य मुंबईकरांचे स्थलांतर रोखणे, एसआरएतील भ्रष्टाचार रोखणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे आदी गोष्टींवर आमचा भर असेल. आमचा अजेंडा सर्वसामान्यांच्या हिताचाच आहे, असा दावा कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी केला.

युती-काँग्रेस आघाडी एकाच माळेचे मणी!
मुंबई पालिका निवडणुकीत पैसा, गुंडगिरी, विकसकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल. चलनात आलेल्या दोन हजारांच्या नोटांमुळे भ्रष्टाचार दुपटीने वाढेल. शिवसेना-भाजप युती व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत सामान्यांची फसवणूक केली आहे. हे पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, असा आरोप करत या निवडणुकीत मतदारांना आम्ही नवा पर्याय देऊ, असा तिसऱ्या आघाडीतील नेत्यांचा दावा आहे.

Web Title: Third Front again in bmc