मुंबई : तृतीयपंथीही रिंगणात; अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणात तृतीयपंथीही उतरले आहेत. प्रस्थापित पक्षांची उमेदवारी टाळून अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. किमान एक तरी महापालिका सभागृहात निवडून जावा, यासाठी शहरातील तृतीयपंथी एकवटले आहेत.

मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणात तृतीयपंथीही उतरले आहेत. प्रस्थापित पक्षांची उमेदवारी टाळून अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. किमान एक तरी महापालिका सभागृहात निवडून जावा, यासाठी शहरातील तृतीयपंथी एकवटले आहेत.

कलिनातील प्रभाग 166 मधून तृतीयपंथी प्रिया पाटील निवडणूक लढणार आहेत. "किन्नर मां' या तृतीयपंथींसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून त्या काम करतात. "नाम अधिकार मंच' (नाम) च्या त्या सदस्य आहेत. त्यांच्यासह जोगेश्‍वरी प्रभाग क्रमांक 77 मधून नितीन कुबल, मरोळ पाइपलाइन प्रभाग 82 मधून भीमराव गमरे, वाशी येथील अशोकनगर प्रभाग 146 मधून भाऊसाहेब वरठे, जुहू गल्ली प्रभाग 66 मधून करुणा हरी वालोदरा, गोवंडी लुंबिनी बाग प्रभाग 139 मधून प्रवीण दाभाडे आदींनीही अर्ज दाखल केले आहेत.

प्रिया पाटील म्हणाल्या, की आजतागायत अनेक आंदोलने व मोर्चे काढून सरकारकडून केवळ आश्‍वासने मिळाली. प्रत्यक्ष कृती होताना दिसली नाही. समाजातील एक भाग असलेल्या तृतीयपंथींना सरकारने पोरके केले आहे. अन्यायाची वागणूक मिळते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तृतीयपंथींना मतदानाचा अधिकार आहे. चेन्नईत तृतीयपंथी पोलिस उपनिरीक्षक आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये शबनम मावशी यांनी महापौर पदाची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे आता महाराष्ट्रात समाज प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात तृतीयपंथी उतरल्याशिवाय पर्याय नाही. तीन वर्षांपासून घरकुलासाठी पाठपुरावा सुरू आहे; पण मागण्या पूर्ण होत नसल्याने आमच्यासह सर्वच नागरिकांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देणार आहोत.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद केली जाते. तशीच तृतीयपंथींसाठी केली जावी. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या समाजात 10 बाय 10 च्या खोलीत 15 ते 20 तृतीयपंथी राहतात. रोजगाराच्या संधी नसल्यामुळे त्यांना नाइलाजास्तव भीक मागून उदरनिर्वाह करावा लागतो. आधार कार्ड व पॅन कार्डावर स्त्री, पुरुष आणि "अन्य' असा उल्लेख असतो. "अन्य' ऐवजी तृतीयपंथी असा स्पष्ट उल्लेख करावा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवडणुकीचा मार्ग स्वीकारला आहे.
- प्रिया पाटील, कार्यक्रम व्यवस्थापक, किन्नर मॉं

Web Title: Third gender will contest election in Mumbai