कल्याण स्थानक परिसराच्या नवीन ‘लूक’साठी तिसऱ्यांदा निविदा

कल्याण : एसटी आगाराच्या प्रवेशद्वारात साचलेले पाणी. 
कल्याण : एसटी आगाराच्या प्रवेशद्वारात साचलेले पाणी. 

कल्याण : कल्याण रेल्वेस्थानकाबाहेरील परिसर आणि एसटी आगार परिसराची दुरवस्था दूर करून स्मार्ट सिटीअंतर्गत चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. परंतु, मागील दोन निविदांच्या प्रतिसादाअभावी काम रखडल्याने आगाराचे स्वरूप अधिक बकाल झाले आहे. सलग तिसऱ्यांदा या कामासाठी ८ नोव्हेंबरला निविदा उघडण्यात येणार आहे. आता तरी त्याला पुरेसा प्रतिसाद मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याण रेल्वेस्थानकाबाहेरील रस्त्यावर अस्ताव्यस्त रिक्षा, फेरीवाले, स्थानकाकडे जाणारे नागरिक यामुळे एकाच वेळी भाऊगर्दी होते. ही कोंडी फुटून, स्थानक परिसरासोबत एसटी आगाराच्या जागेचाही विकास होणार म्हणून एसटी आणि रेल्वे या दोहोंनी या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. कल्याण पश्‍चिममधील स्कायवॉकचा काही भाग तोडून तेथे १२ मीटर उंच सॅटिस बनवण्यात येणार आहे. 

महात्मा फुले चौक ते रेल्वेस्थानक आणि पुढे जाण्यासाठी समांतर पूलवजा रस्ता असेल. मोटारी आणि केडीएमटी व एसटी बस उभ्या करण्यासाठी स्थानक परिसरात; तर रिक्षा व दुचाकी उभ्या करण्यासाठी खाली व्यवस्था करण्यात येणार आहे. कल्याण स्थानकातून बाहेर पडताच नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी सरकते जिने व उद्‌वाहन यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. एकूण अंदाजे ४०० कोटींचा हा प्रकल्प असणार आहे.


स्मार्ट सिटी आराखड्यानुसार एसटी आगाराच्या जागेत भव्य व्यापारी संकुल, बस आगार, पार्किंग प्लाझा होणार आहे. तेथे फेरीवाल्यांचे पुर्नवसन होईल. तर एसटी आगाराची जागा विकसित करण्याबाबत एसटी महामंडळाने तत्त्वतः मान्यता दिली असली तरी किती जागेचा वापर करायचा याबाबत अंतिम मंजुरी बाकी असल्याचे समजते.


मागील दोन निविदांच्या प्रतिसादाअभावी ८ नोव्हेंबर रोजी तिसऱ्यांदा निविदा उघडण्यात आली आहे. त्याला प्रतिसाद मिळताच पुढील कारवाई करू. 
- गोविंद बोडके, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महापालिका  

एसटी आगार परिसराच्या विकासाअगोदर दुरुस्तीची गरज असलेल्या ठिकाणी काम सुरू आहे. आणखी आवश्‍यक असेल तेथे करू.
- विजय गायकवाड, एसटी आगार व्यवस्थापक, कल्याण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com