भीषण वास्तव : कोरोनाचा मुक्काम लांबल्यास 30 टक्के दुकाने बंद होण्याची शक्यता

भीषण वास्तव : कोरोनाचा मुक्काम लांबल्यास 30 टक्के दुकाने बंद होण्याची शक्यता

मुंबई : अनलॉक सुरु होऊनही भीतीने ग्राहक शॉपिंगसाठी येत नाहीत असं सध्याचं  चित्र आहे, त्यामुळे कोरोनाचा मुक्काम आणखी लांबल्यास राज्यातील तीस टक्के दुकाने कायमची बंद पडण्याची भीती आहे, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या परिस्थितीत आम्हाला सरकारची काहीच मदत मिळत नाही, असेही ते म्हणाले. 

कोरोनाच्या फैलावामुळे देशातील छोट्या व्यापाऱ्यांवर वाईट परिणाम होण्याची भीती व्यापारी संघटना व्यक्त करीत आहेत. यामुळे देशातील पावणेदोन कोटी छोटी मोठी दुकाने बंद पडू शकतील, असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे. मुंबई महाराष्ट्रातील परिस्थिती देखील अशीच असल्याचे शहा यांनी सांगितले. 

सध्या पितृपक्ष आहे हे खरं आहे. पण कोरोनामुळे ग्राहकांचा प्रतिसाद फार कमी आहे. कोरोनाची लस येईपर्यंत म्हणजे पुढीलवर्षी एप्रिलपर्यंत अशीच परिस्थिती राहील. नंतरदेखील एकदम धंदा सुधारणार नाही,  तर तो हळुहळूच सुधारेल, असेही ते म्हणाले. आमची अशी अवस्था असताना दुसरीकडे सरकार आम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी नागरिकांना उत्तेजन देत आहेत, ही चांगली बाब नाही, असेही शहा म्हणाले. 

मॉलच्या दुकानांचे भलेथोरले भाडे असल्याने त्यांना या परिस्थितीचा पहिला फटका बसणार आहे. त्यानंतर राज्यात भाडेतत्त्वावर असलेल्या दुकानांची अवस्था वाईट होणार आहे. निम्मे भाडे कमी झाल्याशिवाय त्यांना मान वर करताच येणार नाही.  दुकानाचे भाडे, नोकरांचे पगार, इतर खर्च या सर्व बाबी दुकानदारांना परवडणारच नाहीत. पण दुसरीकडे राज्य सरकार आम्हा दुकानादारांना मदत न करता फक्त ऑनलाईन शॉपिंग करा, असे नागरिकांना सांगत आहे. सरकारने छोट्या दुकानदारांना प्रोत्साहन द्यायला हवे. उलट दुकाने उघडली आहेत, तरीही ऑनलाईन शॉपिंग करा, असे सरकार सांगते हे चूक आहे, असेही त्यांनी दाखवून दिले. 

अशावेळी सरकारने दुकानदारांच्या मदतीसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. मालमत्ता कर, जीएसटी यातून दुकानदारांना सूट मिळाली पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे रदबदली करावी. दुकानदारांना स्वस्त व्याजदरात कर्जे मिळावीत यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. रेल्वे, चित्रपटगृहे, उपगारगृहे पूर्ण क्षमतेने उघडून व्यापारचक्र सुरु होईल, असे पाहिले पाहिजे. त्याचबरोबर लोकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठीही जागरुक केले पाहिजे. शेतकरी तसेच गरीब यांच्यासाठी पावले उचलणारे सरकार आमच्यासाठी काहीच करत नाही. सध्या व्यापार ठप्प होत असताना त्याला सावरण्यासाठी सरकार ठोस पावले उचलीत नाही, हीच आमची खंत असल्याचेही शहा यांनी दाखवून दिले.

( संपादन - सुमित बागुल ) 

thirty percent of the shops will be shut if corona is extended in future

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com