निरोगी हृदयाकरिता एकवटले हजारो पाय!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हिरानंदानी-फोर्टिस हॉस्पिटलतर्फे वाशी येथे रविवारी (ता.२९) आयोजित केलेल्या वॉकेथॉनमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी अडीच किलोमीटर अंतर चालून तरुणांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी ‘दिल से चलो, दिल के लिए’ हा संदेश दिला. 

नवी मुंबई : जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हिरानंदानी-फोर्टिस हॉस्पिटलतर्फे वाशी येथे रविवारी (ता.२९) आयोजित केलेल्या वॉकेथॉनमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी अडीच किलोमीटर अंतर चालून तरुणांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी ‘दिल से चलो, दिल के लिए’ हा संदेश दिला. 
      
बदललेली जीवनशैली आणि खाण्याच्या पद्धतींमुळे भारतात कार्डियोव्हॅस्कूलर डिसीजेज (सीव्हीडी) हे मृत्यूचे प्रमुख करण ठरत आहे. अनारोग्यकारक व बैठे काम करण्याची जीवनशैली अधिक प्रमाणात हृदयविषयक आजार होण्यास कारणीभूत ठरत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी जगभरात जागतिक हृदय दिन साजरा केला जाते. या दिनाचे औचित्य साधून वाशी येथील फोर्टिस-हिरानंदानी हॉस्पिटलतर्फे ‘दिल से चलो, दिल के लिए’ अशा संदेशाचे वॉकेथॉनचे आयोजित केले होते. या वॉकेथॉनच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना आरोग्यदायी हृदयासाठी आरोग्यदायी सवयी अंगिकारण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. या वॉकेथॉनला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ब्रजेश कुंवर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या प्रसंगी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटलचे फॅसिलिटी डायरेक्‍टर संदीप गुदुरू, डॉ. मनीश सोनटक्के, डॉ. समीर चिटणीस, स्मार्ट कन्सेप्टच्या मुग्धा कथुरिया उपस्थित होत्या.

हिरानंदानी- फोर्टिस रुग्णालया-समोरील रस्त्यावरून सकाळच्या सुमारास अडीच किलोमीटरच्या वॉकेथॉनला सुरुवात होऊन रुग्णालयासमोरच सांगता झाली. या वॉकथॉनमध्ये सात वर्षांच्या मुलांपासून ८१ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. देशभरात वाढते कार्डियोव्हॅस्कूलर डिसिजचे योग्यरित्या प्रतिबंध व सामना करण्यासाठी नियमितपणे शारीरिक व्यायाम आणि नियमित कालावधीनंतर हृदयाची तपासणी करण्याचे महत्त्व सांगणे, हा या वॉकेथॉनचा उद्देश होता. जागतिक हृदय दिनानिमित्ताने रुग्णालयात दोन दिवस नवी मुंबईतील ज्येष्ठांसाठी मोफत हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात रुग्णांची बॉडी मास इंडेक्‍स (बीएमआय) तपासणी, रक्‍तदाब तपासणी व ईसीजी अशा तपासणी करण्यात आल्या. तसेच तपासणीनंतर रुग्णांचे डी-इकोकार्डियोग्राम (ईको) आणि ट्रेडमिल टेस्ट (टीएमटी)देखील करण्यात आल्या. या शिबिराचा ५५० हून अधिक वरिष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. 

कामाचा ताण, बैठे काम करण्याची जीवनशैली आणि अनारोग्यकारक सवयींचा आपल्या समाजावर प्रतिकूल परिणाम होत आहे. हा उपक्रम सर्व वयोगटातील व्यक्‍ती हृदय स्वास्थाच्या जीवनशैलीचा अवलंब करण्याच्या आशेसह समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे. 
- संदीप गुदूरू, हिरानंदानी-फोर्टिस, फॅसिलिटी डायरेक्‍टर. 

काम करण्याची जीवनशैली आणि कामाचा ताण अशा बाबींमुळे ३० वर्षे वयाखालील व्यक्‍तींमध्येदेखील हृदयविषयक आजार होत आहेत. दररोज तरुणांमधील हृदयविषयक आजारांच्या प्रमाणामध्ये वाढच होत आहे. 
-डॉ. ब्रजेश कुंवर, वरिष्ठ सल्लागार, इंटरवेन्शनल कार्डियोलॉजी  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of consecutive feet for a healthy heart!