पनवेलमधील पहिल्या रुग्णवाहिकेची अखंडित सेवा; १५ वर्षाची तपश्चर्या| Panvel News Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance service

पनवेलमधील पहिल्या रुग्णवाहिकेची अखंडित सेवा; १५ वर्षाची तपश्चर्या

अविनाश जगधने : सकाळ वृत्तसेवा

कामोठे : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णवाहिका (Ambulance) व शववाहिनी यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या घडीला विविध राजकीय पक्ष (Political Party), सेवाभावी संस्था सामाजिक भावनेतून रुग्णसेवा देत आहेत. मात्र, निस्वार्थपणे, अविरतपणे वाटचाल करणारे, रुग्णसेवा देणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. असेच टिळक रोड मित्र मंडळाने (Tilak Road Mitra Mandal) १५ वर्षांपूर्वी पनवेलमध्ये पहिली रुग्णवाहिका आणि शववाहिका सेवा सुरू केली. केवळ इंधनाचा खर्च घेऊन रुग्णसेवेचे हे व्रत त्यांनी आजतागायत अखंडित ठेवले आहे. कोरोनाच्या संकटातही (corona pandemic) न डगमगता माणुसकीचा धर्म पाळला आहे.

हेही वाचा: पालघर: ७०५ जणांचा सामुदायिक विवाह सोहळा; राज ठाकरे व शर्मिला ठाकरे करणार कन्यादान

मित्रमंडळ म्हणजे समवयस्क व्यक्तींचा समूह असा सर्वसाधारण नागरिकांचा समज आहे. मात्र, सदाशिव पेठेतील टिळक मित्रमंडळाचे तरुण, मध्यमवयीन, ज्येष्ठ असे सर्व सदस्य याच पठडीतील आहेत. २००५ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाचे सदस्य, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, रंगकर्मी चंद्रशेखर सोमण यांनी २००७ मध्ये रुग्णसेवेच्या उदात्त भावनेतून पनवेलमधील काश्यप सभागृहात बैठक घेतली होती. या बैठकीला मंडळाचे अनिल कुळकर्णी, महेश गाडगीळ, संजय जोशी, श्रीकांत पाटणकर, श्रीधर साठे, श्रीकांत साठे, डॉ. मयूरेश जोशी, विश्वेष नातू, किरण गोखले, श्रीपाद खेर, अविनाश सहस्रबुद्धे, मिलिंद गांगल उपस्थित होते.

या सर्वांनी एकत्र येऊन टिळक रोड मित्र मंडळातर्फे माफक दरात रुग्णवाहिका घेण्याचा संकल्प सोडला. देणगीतून रुग्णवाहिकेसाठी काही रक्कम जमा केली. तसेच टिळक रोड परिसरातील नागरिकांना मदतीचे आवाहन केले. नागरिकांनी आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. अल्पावधीतच रुग्णवाहिकेसाठी निधी जमा झाला. १२ मार्च २००७ रोजी तत्कालिन पोलिस उपायुक्त प्रवीण पवार, डॉ. गिरीश गुणे, डॉ. समीर सहस्त्रबुद्धे व सर्व देणगीदारांच्या उपस्थितीमध्ये जीवनरथ रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा टिळक रोड नाक्यावर झाला. या रुग्णवाहिकेसाठी रुग्णांकडून केवळ इंधनाचा खर्च घेतला जातो. आज या (ता. १२) मंडळाच्या रुग्णवाहिका व शववाहिका सेवेला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाचे सिनेट अधिवेशन; प्राध्यापक, परिषदेचे सदस्यही करणार विरोध

लोकसहभागातून वैकुंठ शववाहिनी

या काळात पनवेलमध्ये शववाहिनीचीही कमतरता होती. टिळक रोड मित्र मंडळाने लोकसहभागातून वैकुंठ शववाहिनी नागरिकांच्या सेवेसाठी अर्पण केली. रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मंडळाने मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन जाणे कटाक्षाने टाळले आहे. शहरी भागात अनेकदा मृतदेहाला स्पर्श करण्यासाठी लोक धजावत नाहीत. कोरोनाकाळात तर घराच्या बाहेर पडायचे नाहीत. या वेळी मंडळाच्या सदस्यांनी मृतदेहावरील विधिवत सोपस्कार पूर्ण केले आहेत. १२ फेब्रुवारी २०२० मध्ये पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला शवपेटीचे एक नवे युनिट स्वखर्चाने प्रदान केले.

चालकाचा सिंहाचा वाटा

रुग्णवाहिकेचा चालक राजू शेरगीर याचा मंडळाच्या १५ वर्षाच्या वाटचालीत सिंहाचा वाटा आहे. कोरोनाच्या लाटेत त्याने जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली. या दरम्यान त्याला कोरोनाची झाली; मात्र १४ दिवसांच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा सेवेत रुजू झाला. मेडिको लिगल सेंटर फॉर कॉमन मॅन मंडळाचा प्रस्तावित उपक्रम आहे. रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला,वैद्यकीय उपचारसाठी आर्थिक मदत करण्याचा मंडळाचा मानस आहे.

Web Title: Tilak Road Mitra Mandal Fifteen Years Of Social Work In Ambulance Service To People Panvel News Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..