प्रकल्पग्रस्तांचा सिडकोविरोधात ‘तिरडी’ मोर्चा

प्रकल्पग्रस्तांचा सिडकोविरोधात ‘तिरडी’ मोर्चा
प्रकल्पग्रस्तांचा सिडकोविरोधात ‘तिरडी’ मोर्चा

नवी मुंबई : प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांचा ‘तिरडी’ मोर्चा शुक्रवारी (ता. १५) दुपारी सिडको भवनवर येऊन धडकला. यावेळी प्रकल्पग्रस्त स्त्री-पुरुषांनी प्रतिकात्मक तिरडीसमोर बसून सिडको प्रशासनाच्या नावाने टाहो फोडला. तसेच जोपर्यंत प्रकल्पबाधितांचे पूर्णपणे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत उर्वरित गावांतील एकही घर खाली होणार नाही, असा निर्धार केला. 

कोंबडभुजे गावातून सकाळी दहाच्या सुमारास निघालेला प्रकल्पग्रस्तांच्या मोर्चाला पोलिसांनी अर्बन हाटजवळ अडवले. या मोर्चात किसान सभेचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष संजय ठाकूर, वाघिवली सरपंच अनिल पाटील, दहा गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष पुंडलिक म्हात्रे, वहाळ साईबाबा मंदिराचे प्रमुख रवींद्र पाटील, शिवक्रांती मावळा संघटनेचे अध्यक्ष किरण केणी, श्री नांदाई माता संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. प्रशांत भोईर यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या अखिल भारती अध्यक्ष मरियम ढवळे यांनीदेखील मोर्चाला हजेरी लावून प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला. आमदार बाळाराम पाटील यांनीही प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले, सिडको विरोधातला हा लढा विविध संघटनांनी एकत्रित येऊन लढायला हवा. राज्यात सरकार अजूनही स्थापन झालेले नाही. जोपर्यंत सरकार अस्तित्वात येत नाही तोपर्यंत सिडकोने कोणत्याही प्रकारचे तोडकाम करू नये. 

प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळासह सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत नारनवरे, भूमिअभिलेख अधिकारी संदीप माने यांची भेट घेतली. यावेळी प्रशासनाने बाजारभावानुसार वाढीव भाडे देण्यास तसेच बांधकाम खर्च वाढवून देण्याची मागणी मान्य केली. तसेच मच्छीमारांना नुकसानभरपाई व इतर मागण्यांसाठी पुन्हा मंगळवारी प्रकल्पग्रस्तांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे.

विमानतळ प्रकल्पबाधितांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. जोपर्यंत त्यांचे पूर्णपणे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत उलवे, कोंबडभुजे गावांतील कुटुंब घरे खाली करणार नाहीत.
- रामचंद्र म्हात्रे, अध्यक्ष, किसान सभा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com