esakal | मोठी कारवाई! 'या' खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द, राज्यातली पहिली कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी कारवाई! 'या' खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द, राज्यातली पहिली कारवाई

मुंबई पालिकेनंतर आता ठाणे महानगरपालिकेनंही रुग्णांकडून अवास्तव बील वसूल करणाऱ्या रुग्णालयावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केलीय.  ठाणे महापालिकेनं शनिवारी घोडबंदर भागातील होरायझन प्राइम या खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द केली आहे.

मोठी कारवाई! 'या' खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द, राज्यातली पहिली कारवाई

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः सध्या राज्यात कोरोनाचं सावट आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी प्रशासनानं प्रयत्न करताना दिसताहेत. राज्य सरकारनं कोरोनाच्या उपचारासाठी पालिकेसह खासगी रुग्णालयासाठी खास कार्यप्रणाली आखली आहे. चाचणी, रुग्णालयातील उपचार याची रक्कम राज्य शासनाकडून निश्चित करण्यात आली असतानाही आतापर्यंत खासगी रुग्णालयाकडून अव्वाच्या सव्वा बिलं आकारल्या घटना समोर आल्या आहेत. आता अशातच नोटीस बजावूनही न ऐकणाऱ्या रुग्णालयांवर पालिकेनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

मुंबई पालिकेनंतर आता ठाणे महानगरपालिकेनंही रुग्णांकडून अवास्तव बील वसूल करणाऱ्या रुग्णालयावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केलीय.  ठाणे महापालिकेनं शनिवारी घोडबंदर भागातील होरायझन प्राइम या खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द केली आहे. प्रशासनानं कारवाई करता एक महिन्यांसाठी या रुग्णालयाची मान्यता रद्द केली. 

होरायझन प्राइम रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिलं आकारून वसुली केल्याची बाब महापालिकेनं नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या प्राथमिक अहवालात उघड झाली आहे. अवास्तव बील आकारल्या प्रकरणी कोविड रुग्णालयावर कारवाई झाल्याचं हे राज्यातील पहिलेच प्रकरण आहे. या रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला असून कोविड रुग्णालयाचा दर्जा कायमस्वरूपी रद्द करण्यात आलाय.  ठाणे महापालिका क्षेत्रातील पहिले खासगी कोविड रुग्णालय म्हणून होरायझन प्राइम रुग्णालयास मार्चमध्ये परवानगी देण्यात आली होती.

हेही वाचाः डॉक्टर हवेत! पालिकांची आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी रस्सीखेच; अधिकाधिक पगाराची ऑफर

ठाणे महानगरपालिकेनं आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी खासगी रुग्णालयांना कोविड हॉस्पिटलची मान्यता दिलीय.  हे रुग्णालय तसेच शहरातील इतर खासगी कोविड रुग्णालयांमधूनही वाढीव बिलांची आकारणी केली जात आहे, अशा तक्रारी होत्या.  मात्र या रुग्णालयानं रुग्णांकडून अवाजवी बिले आकारली. त्यामुळे पालिका प्रशासनाने लेखा परिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या भरारी पथकानं ठाण्याच्या विविध रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णालयांनी आकारलेल्या बिलांची ऑडिट सुरू केलीत. त्यात ठाण्याच्या होराइजन प्राईम हॉस्पिटलमधून पालिका प्रशासनाने दिलेल्या दर आकारणी पेक्षा जास्त बिल आकारलेली ५६ बिले आढळून आली.

या रुग्णालयानं २ एप्रिल ते १२ जुलै या कालावधीत एकूण ७९७ रुग्णांवर उपचार केले. त्यापैकी ५७ बिलं लेखा परीक्षणासाठी पथकाकडे सादर करण्यात आली होती. ५६ बिलं गैरवाजवी दराने आकारण्यात आल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली होती. या बिलांची आक्षेपार्ह रक्कम सहा लाख आठ हजार ९०० रुपये इतकी आहे. मुख्य लेखा परीक्षकांनी रुग्णालय व्यवस्थापनाला २० जुलैला नोटीस बजावून याबाबत दोन दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं.

अधिक वाचाः अनलॉक मुंबई ठरतेय जास्त धोकेदायक! इमारतीच्या इमारती कोरोना पॉझिटीव्ह; धक्कादायक माहिती आली समोर

यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून खुलासा न आल्यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेनं या रुग्णालयाचा कोविड केअर रुग्णालयाचा दर्जा रद्द करून एका महिन्यांसाठी या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र मुरुडकर यांनी दिलीय.

होरायझन प्राईम रुग्णालय प्रशासनानं पालिकेनं केलेल्या या कारवाईच्या विरोधात पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. पालिकेने आमचं म्हणणं ऐकून न घेता एकतर्फी कार्यवाही केल्याचा आरोप, रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर ऋषिकेश वैद्य यांनी केलीय.

ठाणे महापालिकेने मुख्य लेखा परीक्षक किरण तायडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमलंय. या पथकाने आतापर्यंत शहरातील १५ खासगी कोविड रुग्णालयांची तपासणी केलीय. या पथकाकडे रुग्णालयांमधून आतापर्यंत एकूण १७५२ बिलं प्राप्त झाली असून त्यापैकी ४८६ बिलांची तपासणी पथकाने पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये पथकाने १९६ आक्षेपार्ह बिलांची नोंद केली असून त्यांची रक्कम २७ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

TMC COVID 19 Horizon Prime Hospital hospital cancels registration overcharges patients

loading image