इच्छुकांना भीती सर्व्हरची

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

आयत्या वेळेस सर्व्हर डाऊन झाल्यास अनेकांची उमेदवारी डाऊन होण्याची शक्‍यता आहे...

ठाणे - निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची धावपळ शेवटच्या टप्प्यात आहे. ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी इच्छुकांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने उमेदवार मेटाकुटीला आले आहेत. त्यातही २ आणि ३ तारखेला एकाच वेळी शेकडो अर्ज दाखल होण्याची शक्‍यता आहे. त्या वेळी सर्व्हर डाऊन झाल्यास अनेकांची उमेदवारी डाऊन होण्याची शक्‍यता आहे.

यंदाच्या पालिका निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करणे अनिवार्य आहे. त्यात उमेदवाराला शेवटच्या टप्प्यापर्यंत बदल करण्याची संधी आहे. अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रत निवडणूक अधिकाऱ्याकडे द्यायची आहे. दोन दिवसांपासून बऱ्याच वेळा सर्व्हर डाऊन होत असल्याने उमेदवार हैराण झाले आहेत. अर्जाची प्रिंट काढण्यापूर्वी अर्ज दाखल करण्याचा सराव इच्छुकांकडून सुरू आहे, परंतु अर्ज भरण्याच्या कामात संथपणा येत असल्याने अनेक अडचणी येत आहेत.
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरू झाले आहे. मंगळवारी सुमारे दोन ते तीन तास सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरणाऱ्यांची धावपळ झाली होती.

विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक आहेत. एकाही पक्षाकडून अद्याप उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. एकाच वेळी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि अर्ज भरण्यासाठी झुंबड उडेल. त्या वेळी सर्व्हर डाऊन असला, तर अर्ज भरायचा कसा, असा सवाल आता इच्छुकांना सतावत आहे. बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना, भाजपने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आघाडीच्या घोळामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचीही यादी जाहीर झालेली नाही. मनसेकडूनही उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही.

चिंता शेवटच्या दिवसाची
शिवसेना आणि भाजपची यादी २ फेब्रुवारी आणि त्याच दिवशी सायंकाळी उशिरा काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक राहणार आहे. त्या वेळी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे. विशेष म्हणजे १० महापालिकांसाठी एकच वेबसाईट असल्याने त्या ठिकाणी इतर पालिकांमधील उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सध्या विशेष गर्दी नसतानाही सर्व्हर डाऊन होत असताना २ आणि ३ तारखेला काय होणार, या चिंतेत अनेक उमेदवार आहेत.

Web Title: TMC election