टीएमटीची तिकीट दरवाढ टळली, अर्थसंकल्प सादर

राजेश मोरे
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) गाळात रुतलेला आर्थिक गाडा रुळावर येण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढ सूचविली जाणार, अशी चर्चा होती. मात्र, कोणतीही भाडेवाढ न सूचवणारा टीएमटीचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा 438 कोटी 86 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) गाळात रुतलेला आर्थिक गाडा रुळावर येण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढ सूचविली जाणार, अशी चर्चा होती. मात्र, कोणतीही भाडेवाढ न सूचवणारा टीएमटीचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा 438 कोटी 86 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.

यामध्ये परिवहन उपक्रमामार्फत 100 आणि खासगी लोकसहभागातून 50 अशा एकूण डीडशे "मिनीपोस्ट बस' खरेदी करण्याची योजना आहे. त्याचबरोबर टीएमटीच्या आगारात नादुरुस्त स्थितीत असलेल्या 103 सीएनजी बस दुरुस्त करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातून तब्बल 253 जादा बस ठाण्यातील प्रवाशांना उपलब्ध होतील, असा दावा करण्यात आला आहे. 

जेलमध्ये अजमल कसाबने ऐकली 'अजान' आणि...

ठाणे परिवहन उपक्रमाच्या वागळे आगारामधील कै. मीनाताई ठाकरे सभागृहामध्ये मंगळवारी अर्थसंकल्पीय सभा पार पडली. परिवहनचे व्यवस्थापक संदिप माळवी यांनी प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 350 कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती.

त्यापैकी महापालिकेकडून केवळ 167 कोटी रुपयांचे अनुदान परिवहनला मिळाले आहे. त्यामुळे यंदा पुन्हा पालिकेकडे मदतीचा हात मागण्यात आला असून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 291 कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. 

'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट' या संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एक लाख लोकसंख्येसाठी तीस बस ताफ्यात असणे आवश्‍यक आहे. ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे 24 लाखांपर्यंत गेली आहे. या लोकसंख्येसाठी टीएमटीच्या ताफ्यात 720 बसगाड्यांची आवश्‍यकता आहे.

मात्र सद्यास्थितीत केवळ 477 बस असून त्यापैकी 340 बस विविध मार्गांवर चालविण्यात येतात. त्यामध्ये खासगी तत्त्वावरील 190, परिवहन उपक्रमाच्या 110, वातानुकूलित 30 आणि तेजस्वीनी 10 बस चालविल्या जात आहेत. एकूण बसपैकी 137 नादुरुस्त असून त्यापैकी 103 सीएनजी बस एएमसी तत्त्वावर दुरुस्त करून चालविण्याचे नियोजन अर्थसंकल्पात आखण्यात आले आहे. 

बोकडाचं हाड आणि कुटुंबात झगडा, कारण वाचाल तर व्हाल हैराण

परिवहन उपक्रमामार्फत 50 मिडी बस खरेदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून या निधीतून मिडीऐवजी बेस्टच्या धर्तीवर 18 आसन क्षमता असलेल्या मिनीपोस्ट बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे 50 मिडी बसच्या खर्चामध्ये दुप्पट म्हणजेच शंभर मिनीपोस्ट बस उपलब्ध होणार आहेत. तसेच अशाच प्रकारच्या आणखी पन्नास बस "पीपीपी' तत्त्वावर घेण्याची योजना प्रशासनाने आखली आहे.

येत्या जुलै महिन्यापर्यंत या बस टीएमटीच्या सेवेत दाखल करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यामुळे 253 अतिरिक्त बस ठाणेकरांना प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, तेजस्वीनीच्या उर्वरित 20 गाड्याही लवकरच ताफ्यात दाखल होणार आहेत. 

पालिकेकडून अपेक्षित अनुदान 

 • महसुली आणि भांडवली खर्च 156 कोटी 11 लाख, 
 • विविध सवलती 33 कोटी 41 लाख, 
 • जीसीसी अंतर्गत बस 34 कोटी 21 लाख, 
 • तेजस्वीनी बस वेतन 6 कोटी 57 लाख, 
 • नवीन 50 मिडी बस वेतन 4 कोटी 93 लाख, 
 • कंत्राटी कामगारांचे वेतन 13 कोटी 51 लाख, 
 • ई-तिकीट यंत्रणेसाठी 3 कोटी 
 • तूट भरून काढण्यासाठी 39 कोटी 30 लाख 

वाहतुकीतून 125 कोटी 60 लाखांचे अपेक्षित उत्पन्न 

 • साधी बस 14 कोटी 36 लाख 
 • जेएनएनयूआरएम 56 कोटी 34 लाख 
 • वोल्वो बस 15 कोटी 87 लाख 
 • 50 तेजस्वीनी बस 9 कोटी 20 लाख, 
 • 50 मिडी बस 6 कोटी 91 लाख 
 • सीएनजी बस 22 कोटी 93 लाख 

इतर मिळकतीतून उत्पन्न 

 • बसवरील जाहिरात 3 कोटी 98 लाख, 
 • विद्यार्थी पास 1 कोटी 23 लाख 
 • निरुपयोगी वाहन वस्तू विक्री 2 कोटी, 
 • पोलिस प्रतिपूर्ती प्रलंबित 12 कोटी 91 लाख 
 • इतर किरकोळ उत्पन्न 1 कोटी 88 लाख 

टीएमटीचा होणारा खर्च 

वाहन दुरुस्ती व निगा : बसच्या दुरुस्ती व निगा याकरिता आवश्‍यक असलेले सुटेभाग, टायर, वाहनांची बाहेरून दुरुस्ती, टायर रिमोल्डिंग, बॅटरी, ऑटो इलेक्‍ट्रिकल सामान आदींसाठी 15 कोटी 75 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. 

डिझेल/सीएनजी : डिझेल खरेदीकरिता एकूण 21 कोटी तर सीएनजीसाठी वार्षिक 15 कोटी 13 लाख इतकी रक्कम खर्च होणार आहे. 2020-21 च्या अंदाजपत्रकात वंगणापोटी वार्षिक 90 लाख असे एकत्रित 37 कोटी 3 लाख इतक्‍या रकमेची तरतूद करण्यांत आली आहे. 

सरकारी कर : मोटर वाहन कर/प्रॉपर्टी विमा/वाहनांचा विमा/भुईभाडे तसेच, बसच्या विम्यासाठी/विमा निधीसाठी एकूण 7 कोटी 87 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी बालपोषण अधिभार व प्रवासाकरिता 4 कोटी 17 लाख इतक्‍या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. 

कर्मचारी थकबाकी देणी : परिवहन सेवेकडील कर्मचाऱ्यांची नोव्हेंबर 2019 अखेर एकूण थकीत देणी 30 कोटी 76 लाख प्रलंबित आहेत. यापैकी ठाणे महापालिकेकडून 30 कोटी 38 लक्ष अनुदान स्वरुपात मागणी करण्यात आली आहे. 

अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये 
वातानुकूलित इलेक्‍ट्रीक बस 
पालिकेच्या माध्यमातून परिवहन सेवेसकरिता नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या खासगी लोकसहभागातील 100 इलक्‍ट्रिक बसपैकी सद्य:स्थितीत 1 बस कार्यान्वित झाली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात 10 बसपोटी परिवहन सेवेस वार्षिक रक्कम 12 लाख इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलेले आहे. उर्वरीत बस परिवहन सेवेत मार्चअखेर दाखल होत आहेत. 

तेजस्विनी बस 
पालिकेच्या माध्यातून ठाणे परिवहन सेवेकरिता केवळ महिलांसाठी 50 तेजस्विनी बसपैकी पहिल्या टप्प्यात 30 बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यापैकी 10 बस संचलनाकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसमुळे महिला प्रवासी संख्येत वाढ अपेक्षित आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात या बसवर 125 महिला कंत्राटी वाहकांची नेमणूक करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात याकरिता 3 कोटी 22 लाख रकमेची तरतूद करण्यात आली आहे. 

नवीन 50 मिडी बसची खरेदी 
परिवहन सेवेच्या ताफ्यातील बऱ्याच बसचे आयुर्मान संपुष्टात आल्याने दुरुस्तीकरिता येणाऱ्या खर्चावर नियंत्रण करण्याकरिता 2020-21 या आर्थिक वर्षात नवीन 50 मिडी बस खरेदी प्रस्तावित करण्यात येणार आहेत. जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत आलेल्या 80 मिडी बसचा प्रतिसाद पहाता, सदर बस खरेदीचे प्रयोजन केले आहे. ठाणे शहरातील अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी यामुळे मिडी बस चालविणे जास्त सुलभ होणार आहे. 

विद्यार्थ्यांना दिलासा 
ठाणे पालिका हद्दीतील व भिवंडी शहरातून ठाणे पालिका हद्दीमध्ये शिक्षणासाठी येणारे शालेय विद्यार्थी व महाविद्यालयातील शेवटच्या वर्षापर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच, आय. टी. आय. व तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टीएमटी बसमध्ये प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. या सवलतीमुळे 1 कोटी 36 लाख लाखांचा आर्थिक बोजा परिवहन प्रशासनावर पडणार आहे. 

ज्येष्ठ नागरिक, अपंगांना सवलत 
अर्थसंकल्पात अपंग व्यक्तींच्या प्रवासासाठी 4 कोटी 8 लाख, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांकरिता तिकीट सवलत अनुदान रक्कम 1 कोटी 72 लाख अशी एकूण 6 कोटी 61 लाख सवलत अनुदानाची मागणी ठाणे पालिकेकडून अपेक्षित धरण्यात आली आहे. पालिका हद्दीमधील ज्येष्ठ नागरिकांना टीएमटी बस भाड्यामध्ये 50 टक्के सवलत देण्यात आलेली आहे. याचा लाभ सरासरी 17 हजार 930 ज्येष्ठ नागरिकांना मिळत असून, त्यापोटी 25 कोटी 43 लाख इतकी रकमेची सवलतीपोटी अनुदान मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे. 

'ईटीआयएम' मशिन 
सध्या परिवहन सेवेमध्ये छापील तिकिटाऐवजी ई-तिकिटींग कार्यप्रणाली (ईटीआयएम) सुरू केल्याने परिवहन सेवेच्या तिकीट व रोखा विभागाकडील तिकीट ब्लॉक इश्‍यूईंग, तिकीट रिकॅन्सिलेशन व व्हॅल्युएशन कामात कपात झाली आहे. त्यामुळे मानवी चुकांवर निर्बंध येऊन कामाच्या गुणवत्तेत वाढ झालेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TMT ticket price hike avoided, budget submitted