सामाजिक कार्यात शिवप्रेमी मित्र मंडळ अग्रेसर
मुरूड तालुक्यातील मजगाव पंचक्रोशीतील श्री शिवप्रेमी मित्र मंडळाची स्थापना २०१५ मध्ये करण्यात आली. संस्थापक नाथा भाऊ गिरणेकर हे आहेत. सध्या त्यांच्याकडे अध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. आशीष बुल्लू, समीर माळी, नितेश कांबळे, महेश घाग, निखिल मानाजी, सिद्धेश बेडेकर, शनिकेत भोईर, परेश पाटील आदी युवक या संघटनेचे आधार आहेत.
मंडळाच्यावतीने शिवजयंती, शिव पुण्यतिथी आदी विशेष दिनी आवर्जून कार्यक्रम होतात. मुलांचा योग्य दिशेने विकास व्हावा म्हणून वक्तृत्व, चित्रकला, निबंध अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यामधील विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येतात. शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांबाबत जनजागृती करून त्यांची स्वच्छता करण्यासाठी मोहिमा घेण्यात येतात.
मुरूड तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेकांच्या बागायत वाड्या जमीनदोस्त होऊन होत्याचे नव्हते झाले. या काळातही वाड्या सफाईसाठी युवकांनी पुढाकार घेत नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.
पूरग्रस्त स्थितीत प्रभावित गावांना मदत केली. विशेषतः कोविड काळात जनजागृती केली. काही ठिकाणी अन्न धान्याचे वाटपही केले.
महाडच्या सावित्री नदीने उग्र रूप धारण करून अनेकांचे जीवन विस्कळित केले. अशा परिस्थितीत महाडमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून अन्न आणि पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. ग्रामस्वच्छतेच्या कामातही मंडळाच्या अनेक युवकांनी हातभार लावला होता.
शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगड ते मजगाव अशी पदयात्रा दरवर्षी काढण्यात येते. तसेच किल्ले दुर्ग दुर्गेश्वर रायगड ते मजगाव मशाल पदयात्राही दरवर्षी आयोजित केली जाते. या मध्ये
युवकांचा प्रतिसाद उत्तम असतो. दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांतून युवक-युवतींना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचा सुप्त गुणांना वाव मिळवून दिला जातो.
सामाजिक बांधिलकी जोपासत श्री शिवप्रेमी मित्र मंडळ हे समाजाचे आपण काही तरी देणे लागतो हा विचार घेऊन काम करत आहे, असे युवा कार्यकर्ता आशीष बुल्लू यांनी सांगितले. या मंडळाची दखल सरकारी पातळीवरही घेतली आहे.
- मेघराज जाधव