देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय राज्यात उभारणार

देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय राज्यात उभारणार

मुंबई, ता. ३१ : देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय राज्यात उभे राहणार असून त्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. हे संग्रहालय पुणे येथे असलेल्या राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) मार्फत उभे केले जाणार आहे. बालभारतीच्या मुख्यालय परिसरात हे संग्रहालय उभे केले जाणार असून ऐनवेळी आवश्यकता पडल्यास ते मुंबईतही उभारण्याचा विचार होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या नियामक मंडळाची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत राज्यात उभे राहणाऱ्या पहिल्या पाठ्यपुस्तक संग्रहालयासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. बालभारतीमार्फत उभे राहणाऱ्या पहिल्या पाठ्यपुस्तक संग्रहालयात १८३७ पासूनची अत्यंत दुर्मिळ पुस्तके, त्यासोबतच बालभारतीकडून काढल्या जाणाऱ्या सृजन, तसेच शिक्षण मंडळाच्या शिक्षण संक्रमण आदी पुस्तके, दस्तावेज एकाच छताखाली ठेवली जाणार आहेत. यासोबत देशभरातील विविध भाषा आणि विषयातील पाठ्यपुस्तकेही या संग्रहालयात एकत्र ठेवली जाणार असल्याने हे संग्रहालय विद्यार्थी, शिक्षक, तज्ज्ञ आणि अभ्यासकांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षणमंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारने नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात‍ या पाठ्यपुस्तक संग्रहालयाच्या निर्मितीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे हे संग्रहालय पुण्यात की मुंबईत उभे केले जाईल, यावर लवकरच प्रारूप जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
...
अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. ही सर्व पुस्तके अमूल्य असून या सर्व पुस्तकांचे स्कॅनिंग/डिजिटलायझेशन करून ऑनलाईन डिजिटल संग्रहालय केल्यास जगभरातील सर्वांनाच या पुस्तकांचा लाभ घेता येईल. याची पुढे राज्यभरात व्याप्ती वाढवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही पुस्तके वाचण्यासाठी मिळतील अशी सोय केली जावी.
- राजेंद्र धारणकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
...
शिक्षणमंत्र्यांनी देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय राज्यात उभे राहणार हे जाहीर केले. त्यानुसार देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय निर्माण करण्याच्या प्रक्रियेबाबत शासनाशी, संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल.
- कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com