मंत्री नवाब मलिक यांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आज विशेष न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत वाढ केली.
मुंबई - मनी लॉण्डरिंग (Money Laundering) प्रकरणात अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांच्या न्यायालयीन कोठडीत (Custody) आज विशेष न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत वाढ केली. आज न्यायालयीन कोठडी संपत असल्याने मलिक यांना सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. त्या वेळी न्यायालयाने त्यांची कोठडी चार दिवसांनी वाढवली.
मलिक यांनी ईडीच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर २२ एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती विशेष न्या. राहुल रोकडे यांना ॲड. कुशल मोरे यांनी दिली. त्यामुळे न्यायालयाने रिमांडवर २२ एप्रिल रोजी सुनावणी निश्चित केली. मलिक यांनी न्यायालयात मूत्रपिंड विकाराबाबत माहिती दिली. मूत्रपिंडाच्या त्रासामुळे माझे पाय सुजले आहेत. त्यावर वेदनाशामक औषधे कारागृहात दिली जातात; परंतु कायमस्वरूपी इलाज आवश्यक आहे, असे त्यांनी न्यायालयात सांगितले.
कुर्ला येथील जुन्या जमीन खरेदी व्यवहारात गँगस्टर दाऊद इब्राहिमसाठी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ईडीने मलिक यांच्यावर ठेवला आहे. संबंधित व्यवहार कायदेशीर पद्धतीने झाला असून त्यामध्ये गैरव्यवहार झालेला नाही. केवळ राजकीय वैमनस्यातून हा आरोप ठेवला आहे, असा बचाव मलिक यांनी केला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.