बुस्टर डोसमध्येही सावळा गोंधळ

बुस्टर डोसमध्येही सावळा गोंधळ

बूस्टर डोससाठी सावळागोंधळ आपत्कालीन परिस्थितीत वेगळे केंद्र सुरू करण्याची वेळ सकाळ वृत्तसेवा अलिबाग, ता. १० : फ्रंटलाईन वर्कर आणि दीर्घ आजाराने ग्रस्त असलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना सोमवार (ता. १०) पासून कोरोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. मात्र यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले नव्हते. त्यामुळे दुपारी १२ वाजताच्या दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत डोससाठी अलिबागमध्ये वेगळे केंद्र सुरू करून मुहूर्त साधण्यात आला. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक इतर लसीकरण केंद्रांची होती. बूस्टर डोससाठी जिल्ह्यात १७ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. यात प्रशासनाने चुकीची माहिती दिल्याने ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास झाला. ९ एप्रिल पूर्वी दोन्ही डोस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक, फ्रंट लाईन वर्कर, हेल्थ वर्कर यांच्यासाठी तिसरा बूस्टर डोस आहे. यासाठी अलिबागमध्ये ११ वाजेपर्यंत लसीकरण केंद्रांचा थांगपत्ताच नव्हता. सकाळपासून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीन तास ताटकळत राहावे लागले. डोंगरे हॉल येथील लसीकरण केंद्रात सुरू असलेल्या मुलांच्या लसीकरणामुळे आधीच गर्दी होत असते. याच ठिकाणी दुसऱ्या डोससाठी येण्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे डोंगरे हॉल येथील लसीकरण केंद्रात गर्दी झाल्याने गोंधळ निर्माण झाला. अखेर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार अलिबाग शहरातील ब्राह्मणआळी येथील सावित्री पर्ल इमारतीमधील एका फ्लॅटची स्वच्छता केल्यानंतर साडे अकरा वाजता लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र लसीकरण केंद्राची स्वच्छता होईपर्यत ज्येष्ठ नागरिकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर त्यांचे लसीकरण सुरळीत सुरू झाले. *** सरकारी कर्मचाऱ्यांना प्राधान्य सोमवारी दुपारपर्यंत केंद्रावरील लसीकरण थांबविण्यात आले. त्यानंतर राहिलेले डोस शासकीय कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना बाधितांची संख्या जास्त असल्याचे कारण सांगत जिल्हाधिकारी कार्यालयात बूस्टर डोससाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पोलिस वसाहतीमध्येही डोस देण्यात आले. *** ज्येष्ठ नागरिकांचा इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी प्रतिसाद मिळेल, असा अंदाज नव्हता. नागरिकांची संख्या वाढत गेल्याने गर्दीच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना डोस देणे योग्य नसल्याने वेगळे केंद्र सुरू करावे लागले. यात थोडासा विलंब झाला; परंतु त्यानंतर लसीकरण सुरळीत झाले. - डॉ. गजानन गुंजकर, लसीकरण अधिकारी, रायगड. *** आम्ही सकाळी ७ वाजल्यापासून डोंगरे हॉल येथे नंबर लावून बसलो होतो. मात्र, ९ वाजेपर्यंत अधिकारी केंद्रावर दिसले नाहीत. त्यानंतर तिसऱ्या डोससाठी येणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. यामध्ये लशीच्या मुदतीबाबत स्पष्टता नसल्याने ती तपासून पाहण्यात आमचा जास्त वेळ गेला. - शांताराम नाईक, ज्येष्ठ नागरिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com