जेएसडब्ल्यू कोल प्लाँटमुळे धरमतर खाडीत प्रदूषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेएसडब्ल्यू कोल प्लाँटमुळे धरमतर खाडीत प्रदूषण
जेएसडब्ल्यू कोल प्लाँटमुळे धरमतर खाडीत प्रदूषण

जेएसडब्ल्यू कोल प्लाँटमुळे धरमतर खाडीत प्रदूषण

sakal_logo
By
जेएसडब्ल्यू कोल प्लाँटमुळे धरमतर खाडीत प्रदूषण दूषित पाण्यामुळे मासे मृत; परंपरागत मासेमारी व्यवसाय धोक्यात सकाळ वृत्तसेवा अलिबाग, ता. १२ : जेएसडब्ल्यू कंपनीच्या कोल प्लाँटमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात धरमतर खाडीतील मासे तडफडून मरत आहेत. यामुळे येथील मच्छीमारांचा परंपरागत मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. यावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक मच्छीमारांनी आवाज उठवल्याने कंपनी प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यास तयारी दर्शवली आहे. जेएसडब्ल्यू कंपनीतील कोल प्लाँटमधून प्रदूषित झालेले गरम पाणी कोणतीही प्रक्रिया न करता खाडीत सोडले जाते. त्यामुळे दररोज हजारो किलोचे मासे हे खाडीतच मरून पडत आहेत. कंपनीच्या प्रदूषणामुळे काचली, पिटकीरी, खातीवरे, कातळपाडा, डभेवाडी, कुसुंबळे, वाघविरा, चिखली, हेमनगर या गावातील १५० ते २०० पारंपरिक मच्छीमार कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ओहोटीमध्ये खाडीतील पाणी कमी झाल्यानंतर खाडीच्या किनाऱ्यावर मृत मासे पडलेले दिसून येतात. हे मासे खाण्यास अयोग्य असल्याने त्याचा कोणताही उपयोग होत नाही. खाडीतील मासे पकडून ते बाजारात विकण्याचा येथील कुटुंबीयांचा पिढ्यानपिढ्याचा पारंपरिक व्यवसाय आहे; मात्र कंपनीतून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे तो संकटात आला आहे. दररोज वाया जाणाऱ्या या मत्स्यसंपदेकडे हताश होऊन पाहण्याशिवाय मार्ग राहिलेला नसल्याने शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांच्या माध्यमातून दाद मागितली होती. काचली, पिटकीरी, चिखली येथील ग्रामस्थांनी रविवारी (ता. ९) खाडीमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून प्रदूषणाची बाब अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर बुधवारी तातडीने बैठक बोलावून कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही चर्चेसाठी येण्यास सांगितले. राजमळा येथे झालेल्या बैठकीसाठी जेएसडब्ल्यू कंपनीचे एचआर अधिकारी बळवंत जोग उपस्थित होते. त्यांनी या प्रदूषणाची पाहणी करून मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. *** पाहणी करून दूषित पाणी सोडण्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर ज्या मच्छीमारांचे नुकसान झालेले आहे, त्यांची नुकसान भरपाई देण्यास कंपनी बांधील आहे. काही दिवसांतच ही भरपाई दिली जाईल. - बळवंत जोग, एचआर अधिकारी, जेएसडब्ल्यू
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top