आक्षीमधील मराठी शिलालेखाला नवसंजीवनी
जिल्हा नियोजनासह प्रादेशिक पर्यटनातून होणार सुशोभीकरण
प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग तालुक्यातील आक्षी येथे मराठी शिलालेख अनेक वर्षांपासून ऊन-पावसात आहे. त्याचे जतन करण्यासाठी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे. याद्वारे पर्यटन वाढीला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा नियोजन व प्रादेशिक पर्यटनातून निधी खर्च करण्यात येणार आहे.
आक्षी हे गाव पर्यटनाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक पर्यटक या ठिकाणी येतात. हे गाव ऐतिहासिक क्षेत्र म्हणूनदेखील ओळखले जाते. गावात दोन प्राचीन मराठी शिलालेख आहेत. ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक डॉ. श. गो. तुळपुळे यांच्या संशोधनानुसार मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले.
मराठी भाषेतील पहिले शिलालेख १०१२ या वर्षातील आहेत. शिलालेख संस्कृत, देवनागरी लिपीमध्ये आहेत. यातील पहिला शिलालेख खासगी जागेत आहे. दुसरा शिलालेख हा आक्षी स्तंभ ते समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्याच्या बाजूला आहे. दरवर्षी मराठी भाषा दिनाच्या दिवशी प्रशासन व वेगवेगळ्या संस्था संघटनाच्या वतीने या शिलालेखाला भेट देऊन पुष्पहार घातले जातात. त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष होते. या दोन्ही शिलालेखांच्या संवर्धनाबरोबरच जतन करण्यासाठी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी उंच चौथरा बांधून त्याठिकाणी फलाट तयार करून दिला जाणार आहे. तसेच परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे वीस लाख रुपयांचा निधी खर्च येणार आहे. जिल्हा नियोजन समिती व प्रादेशिक पर्यटनातून यासाठी निधीची तरतूद केली जाणार आहे.
या शिलालेखांच्या सुशोभीकरणामुळे आक्षीमध्ये पर्यटन वाढीला अधिक चालना मिळेल.
...................
मराठी प्राचीन शिलालेखाची माहिती आजच्या पिढीला मिळावी. आक्षीमध्ये येणाऱ्या पर्यटकांनादेखील येथील इतिहास समजला पाहिजे. यासाठी येथील शिलालेखाच्या संवर्धनाबरोबरच सुशोभीकरणासाठी प्रयत्न सुरू केले. जिल्हा नियोजन समितीसह प्रादेशिक पर्यटनातून निधी खर्च केला जाणार आहे. यामुळे पर्यटन वाढीला अधिक गती मिळणार आहे.
- अदिती तटकरे, पालकमंत्री रायगड.