मुंबई सेंट्रलवरील पॉड हॉटेलला प्रवाशांचा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई सेंट्रलवरील पॉड हॉटेलला प्रवाशांचा प्रतिसाद
मुंबई सेंट्रलवरील पॉड हॉटेलला प्रवासांचा प्रतिसाद

मुंबई सेंट्रलवरील पॉड हॉटेलला प्रवाशांचा प्रतिसाद

मुंबई : नोव्हेंबर २०२१ मध्ये भारतीय रेल्वेमधील सर्वांत पहिले ‘पॉड हॉटेल’ (Pod Hotel)पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल(Mumbai Central) स्थानकात उभारण्यात आले. गेल्या एका महिन्यात या हॉटेलला दररोज सरासरी १५ ते २० प्रवासी भेट दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विमानतळावर ज्याप्रमाणे प्रवासीभिमुख सेवा दिल्या जातात, त्याप्रमाणे रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक आणि आरामदायी सुविधा देण्याचा रेल्वेचा भर आहे. यातूनच या पॉड हॉटेलची उभारणी केली असून, महिनाभरातील प्रतिसादावरून हे हॉटेल प्रवाशांच्या पसंतीस उतरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँण्ड टुरिझम् कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) (Indian Railway Catering and Tourism Corporation)आणि भारतीय रेल्वेच्या वतीने मुंबई सेंट्रल स्थानकात पॉड हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना तात्पुरत्या कालावधीत आराम करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरला हे पॉड हॉटेल प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. गेल्या एक महिन्याच्या कालावधी या हॉटेलला अनेक प्रवाशांनी भेटी दिल्या. दररोज १५ ते २० प्रवासी पॉड हॉटेलमध्ये राहतात. हॉटेलमध्ये एकूण ४८ पॉड आहेत. एकाच वेळी येथे ४८ जण राहू शकतात.

यामधील ३० क्लासिक, महिलासांठी सात, खासगी १० आणि अपंगांसाठी एक पॉड आहे. इतर सर्व पॉडमध्ये एकटेच राहण्याची सोय असून, अपंगांसाठी एका पॉडमध्ये दोघा व्यक्तींना राहण्याची सुविधा आहे. पॉट हॉटेलमध्ये पाळीव प्राणी, खाद्यपदार्थ खाणे, चप्पल घालून फिरण्यास मनाई आहे. हॉटेलमध्ये १० कर्मचारी कार्यरत असून, या सर्वांद्वारे प्रवाशांना सेवा दिली जाते. चौकट दरात कपात पॉड हॉटेलचे दर सुरुवातीला १२ तासांसाठी ९९९ रुपये आणि २४ तासांसाठी एक हजार ९९९ रुपये प्रतिव्यक्ती होते; तर आता १२ तासांसाठी ७९९ आणि २४ तासांसाठी एक हजार १९९ रुपये झाले आहेत; तर दिव्यांग व्यक्तींना १२ तासांसाठी एक हजार ४९९; तर २४ तासांसाठी दोन हजार ९९९ इतके दर लावण्यात आले आहेत.

कोट पॉड हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक प्रवासी सेवा, स्वच्छता पाहून खूश होतो. हॉटेलमध्ये येणारे सर्वाधिक प्रवासी लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधील असतात. हॉटेलमध्ये प्रामुख्याने उद्योगपती, व्यावसायिकांचा प्रतिसाद अधिक मिळत आहे. त्यातही २४ तासांऐवजी १२ तास राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार हॉटेलच्या सुविधेत नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला जाईल.

- अजय पंडित, महाव्यवस्थापक, अर्बन पॉड

टॅग्स :Mumbai News