टीईटीची ऑक्टोबरमध्ये झालेली परिक्षाही संशयाच्या फेऱ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TET exam
टीईटीची ऑक्टोबरमध्ये झालेली परिक्षाही संशयाच्या फेऱ्यात

टीईटीची ऑक्टोबरमध्ये झालेली परिक्षाही संशयाच्या फेऱ्यात

पुणे : शासनाच्या विविध विभागांच्या परीक्षा(Exam) घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या विनर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिडेटच्या (Winner Software Pvt. Ltd.)संचालकास शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रकरणात अटक करण्यात आली आहे. याच कंपनीने ऑक्टोबरमध्ये टीईटीची परिक्षा घेतली होती. त्यामुळे ती परिक्षा देखील आता संशयाच्या फेऱ्यात आली आहे.

सौरभ महेश त्रिपाठी (वय ३९, मुळ रा. ली रेसीडेन्सी गाझियाबाद, सध्या रा. बेलमोरक इस्टेट, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. टीईटी परिक्षेत अपात्र ठरलेल्या ५५० ते ६०० विद्यार्थ्यांची यादी त्रिपाठी याने इतर साथीदारांच्या मदतीने तयार केली असल्याची माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी मंगळवारी (ता. २२) न्यायालयाला दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी त्याला ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात यापूर्वी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक अश्विनकुमार शिवकुमार आणि माजी शिक्षण आयुक्त सुखदेव हरी डेरे यांना अटक करण्यात आली आहे.

२०१८ मध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परिक्षेच्या जाहिरातीनुसार १५ जुलै २०१८ रोजी ही परिक्षा घेण्यात आली होती. तर तिचा निकाल १२ ऑक्टोंबर २०१८ मध्ये लागला होता. ही सर्व परिक्षा घेण्याची जबाबदारी जी.ए सॉफ्टवेअरकडे होती. या परिक्षेत अश्‍विनकुमार याने डेरे, तुकाराम सुपे, डॉ. प्रीतिश देशमुख, अभिषेक सावरीकर, सौरभ त्रिपाठी, संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांच्यासह संगनमत करून गैरव्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे. त्रिपाठीचा या प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला लखनौ येथून अटक करत न्यायालयात हजर केले. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. जाधव यांनी केली.

सानप भाजपचा माजी पदाधिकारी

आरोग्य भरती परीक्षेत गट ड आणि क पदाचा पेपर परिक्षेपुर्वी अनेक विद्यार्थ्यांना पाठविणाल्या प्रकरणी सायबर पोलिसांनी अटक केलेला एजंट हा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संजय शाहूराव सानप (वय ४०, रा. पाटोदा, बीड) असे अटक करण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे. त्याला न्यायालयाने २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सानप हा उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात लिपिक असून त्याने परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फोडून ती परीक्षार्थींना देण्यासाठी एका मंगल कार्यालयात वर्ग भरविला होता.

टॅग्स :Pune NewsTET Exam