उपनगरात फ्लेमिंगों दर्शनाची सोय
महापालिका गोरेगाव खाडीकिनाऱ्यावर गॅलरी उभारणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पश्चिम उपनगरातूनही आता फ्लेमिंगोचे दर्शन घेता येणार आहे. गोरेगाव येथे खाडीकिनाऱ्यावर महापालिका व्ह्युविंग गॅलरी बांधणार आहे. सर्व मंजुऱ्या मिळाल्यानंतर पुढल्या काही महिन्यांतच फ्लेमिंगोसह इतर स्थालांतरित पक्षी सहज पाहता येणार आहेत.
शिवडी खाडीपासून ठाण्याच्या खाडीपर्यंत फ्लेमिंगो अभयारण्य जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी ठाण्याच्या खाडीत एरोली येथे बोट सफारीतून फ्लेमिंगोच्या सान्निध्यात राहता येते; मात्र पश्चिम उपनगरातील पक्षीप्रेमींसह बच्चेकंपनीला यासाठी पूर्व उपनगरात येण्याची गरज भासणार नाही. महापालिका सुमारे एक ते सव्वा कोटी रुपये खर्च करून व्ह्युविंग गॅलरी बांधणार आहे. ही गॅलरी बांधण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असल्याचे पालिकेचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार दोंदे यांनी सांगितले.
गोरेगाव क्रिक रोड परिसरातील उद्यानाच्या बाजूला ही गॅलरी बांधण्यात येणार आहे. दोन मजली गॅलरीत प्रत्येक मजल्यावर आठ ते दहा माणसे उभी राहू शकतील, अशी सोय असेल. त्याचबरोबर तेथे दुर्बिणही बसविण्यात येणार आहे. व्ह्युविंग गॅलरीवर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाईल. या परिसरातील विविध झाडे-पक्ष्यांची माहिती देणारी माहितीपूर्ण वॉलही तयार करण्यात येईल. येत्या एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण करून पर्यटकांसाठी खुले करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट्य आहे.
...
मार्गही आकर्षक
- गॅलरीपर्यंतचा मार्गही आकर्षक बनविण्यात येणार आहे.
- या मार्गात विविध पक्षी तसेच इतर अन्य जिवांची माहिती देणारे फलक असतील.
- या ठिकाणाहून फ्लेमिंगोसह उद्यानातील पक्षी-झाडेही न्याहाळता येतील.
- इथे येणाऱ्यांना बसण्यासाठी गार्डनबाहेर व्यवस्था करण्यात येईल.
- या ठिकाणच्या गार्डनचे सौंदर्यीकरणही, आकर्षक रोषणाईदेखील करण्यात येणार आहे.
...
जापनीज गोलाकार जिने
साधारण पुरुषभर उंचीवर गॅलरीचा पहिला मजला असेल. त्यावर दुसरा मजला असेल. तेथे पोहचण्यासाठी जापनीज पद्धतीचे आकर्षक गोलाकार जिने असतील. निसर्गाशी एकरूप असे बांधकाम करण्याचा महापालिकेचा विचार आहे.
...