प्रदुषण- विद्याधर वालावकर लेख

प्रदुषण- विद्याधर वालावकर लेख

विद्याधर वालावकर ------- प्रदूषण न रोखल्यास विनाश इंट्रो हिंदुस्तान पेट्रोलियममधून झालेल्या गळतीमुळे रासायनिक पावडर सर्वत्र हवेत पसरली आणि ती माहुल परिसरातील वस्तीवर पावसाच्या स्वरूपात पडली. हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी ही पावडर विषारी नसल्याचे सांगितले. डोंबिवलीमध्येही प्रदूषणामुळे रंगीत पाऊस पडल्याने सर्व रस्ते व पाण्याची गटारे रंगीत झाली; परंतु अहवालाअंती ते विषारी नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. असे असले, तरी पर्यावरणपूरक जीवनशैलीने आपण अॅसिडनिर्मितीचे हे दुष्टचक्र थांबवले नाही; तर ही आम्लवर्षा आपल्या परिसरातील जीवसृष्टी, जंगल, जमिनीच्या सुपीकतेचा विनाश करेल. लेख बहुतांश रासायनिक कारखान्यांमधून अनेकविध प्रकारचे प्रदूषित वायू नियंत्रित स्वरूपात बाहेर सोडले जातात. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांप्रमाणे यामधील विषारी वा अपायकारक घटक हवेत सोडण्यास मनाई आहे. अत्याधुनिक प्रदूषण नियंत्रण यंत्रांनी या उत्सर्जित होणाऱ्या हवेमधील सर्व अपायकारक घटक हे पाण्याच्या, अल्कलीच्या वा इतर रसायनांच्या साह्याने वेगळे केले जातात. या सर्व प्रक्रियांमधील मानवी, यांत्रिक वा रासायनिक चुकीमधून माहुल व डोंबिवलीसारखे अपघात घडतात. रासायनिक अभिक्रियांमधील तापमानाचे नियोजन हे यंत्र चालवणाऱ्या चालकाचे कौशल्य असते. या कौशल्याला योग्य ऊर्जेचा पुरवठा तसेच अत्याधुनिक यांत्रिक प्रणालींची आवश्यकता असते. यांच्या अभावातून अनेकदा तापमानाचे नियोजन बिघडते. रासायनिक अभिक्रिया अधिक गतीने व अनेकदा अनपेक्षित अशा रसायनांना उत्सर्जित करते. ही वायुरूपातील रसायने धोकारहित करताना त्यांचे मोठ्या प्रमाणात हवेमध्ये विसर्जन केले जाते. त्यामुळे तापमानात एकदम झालेल्या बदलांमुळे ही सर्व रसायने वायुरूपातून द्रवरूपात वा घनरूपात परावर्तित होतात आणि त्या उत्सर्जित धुराच्या ढगांमधून चक्क पाऊस पडायला लागतो. हवेमधे कार्बन डायऑक्साइड (CO२), नायड्रोजन ऑक्साइड (NO२) आणि सल्फर डाय ऑक्साइड (s०२) यासह वायुरूप प्रदूषकांचे प्रमाण वाढले व त्यामध्ये इतर रसायनांची वाफ मिसळली की त्याचे द्रवरूपात किंवा सूक्ष्मकणांत रूपांतर होते आणि त्याचा पाउस जमिनीवर पडतो. याचा अर्थ मानवाच्या सर्व प्रकारच्या क्रियांमधून, जवळच्या औष्णिक विद्युत केंद्रातून, रासायनिक कारखान्यातून, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतुकीमधून होणारे प्रदूषण या सर्व प्रदूषणातून आम्लपावसाची निर्मिती होते. या रासायनिक पावसाचे दुष्परिणाम परिसरातील सर्व सजीव सृष्टीवर होतात. या रसायनामुळे विशेषतः सूक्ष्मजीव, लहान आकाराचे कीटक, छोटी झाडे यांचा समूळ विनाश होतो. रस्त्यावरील प्राणी व इतर सजीवांना यामुळे त्वचारोग व श्वसनरोग होतात. धातूंची वाहने व इतर मोठी धातूंची बांधकामे यांच्या गंजण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होते. या पावसाचा जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो. अशा प्रकारचा पाऊस पडू नये म्हणून नागरिक, व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापनांनी प्रदूषणाबाबतचे निर्बंध पाळणे आवश्यक आहे. असा पाऊस पडल्यानंतर त्वरित पावसाच्या पाण्याचे परीक्षण करून त्यामधील विषारी घटक ओळखल्यास त्या घटकाचा दुष्परिणाम थांबवणारे उपाय हे त्या परिसरात राबवता येतील. अॅसिड रेन थांबवण्यासाठी आपल्याला खनिज इंधनाचा वापर कमी करावा लागेल. पेट्रोलजन्य पदार्थांपासून ऊर्जा किंवा त्यांचा ऊर्जास्रोत म्हणून वापर झाल्यास वातावरणामध्ये निरंतर प्रदूषित वायूंचे उत्सर्जन होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्लनिर्मिती होते. ऊर्जेची आवश्यकता निरंतर वाढत चालल्यामुळे पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर वाढवायला हवा. सौरऊर्जा किंवा वाऱ्यापासून निर्मित केलेली ऊर्जा तसेच भूगर्भातील ऊर्जेचा वापर करून आपण प्रदूषणाला आळा घालू शकतो. रासायनिक उद्योगांमध्ये वापरला जाणारा कच्चा माल व रसायने याची पूर्ण माहिती घेऊन त्यांच्या उत्सर्जन शक्यतांचा तसेच रासायनिक प्रक्रियेच्या दरम्यान होणाऱ्या विविध प्रकारच्या उत्सर्जनांचा पूर्ण अभ्यास करून त्यांच्या वातावरणाशी होणाऱ्या अभिक्रिया कमी करू शकतो किंवा कमी हानीकारक करू शकतो. प्रदूषण वा प्रदूषित वायूंची निर्मिती ही योग्य प्रमाणात झाल्यास आम्लनिर्मितीला आळा घालता येऊ शकतो. अपघाताने किंवा मानवी अथवा यांत्रिक चुकीमधून होणाऱ्या उत्सर्जनातून मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची निर्मिती होते आणि आम्लवर्षेची शक्यता वाढते. उत्तम व्यवस्थापनातून आपण हे संकट दूर करू शकतो. वाहतुकीच्या साधनांतून सर्वाधिक प्रदूषणनिर्मिती होते. त्यामुळे शहरांमधील वाहतुकीमध्ये अप्रदूषणकारी वाहनांचा व इंधनाचा वापर होणे आवश्यक आहे. विजेवर चाळणारी वाहने ही महानगरांच्या प्रदूषणात भर घालत नाहीत, म्हणून विजेवर चालणाऱ्या गाड्या, बस तसेच मेट्रो किंवा रेल्वेसारखी साधने शहराच्या जीवनवाहिन्या झाल्यास त्यामुळे अॅसिडरेनची शक्यता कमी होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com