मेगाब्लॉक दिवशी केडीएमटीला अल्प प्रतिसाद
डोंबिवली, ता. ३ ः पाचव्या सहाव्या मार्गिकेसाठी ठाणे-दिवादरम्यान रविवारी (ता. २) २४ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला. यामुळे ठाणे ते कल्याण मार्गावरील अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल गाड्या पूर्णपणे बंद असल्याने ठाकुर्ली, कोपर स्थानकातील लोकल गाड्या पूर्ण बंद होत्या. या वेळी प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमटीच्या वतीने ठाकुर्ली व कल्याण ते डोंबिवली ९० फीट मार्गावर विशेष दहा बसेसची सोय करण्यात आली होती. केडीएमटीने नियोजन तर केले; मात्र त्या विशेष सेवेलाही अल्प प्रतिसाद लाभला.
ठाणे-दिवा स्थानकादरम्यान रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी रविवारी २४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकुर्ली या धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या पूर्णपणे बंद होत्या. यावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या वतीने विशेष दहा बसची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केली होती. तसेच दोन्ही ठिकाणी संचलनासाठी अधिकारीदेखील तैनात ठेवण्यात आले होते. कल्याण ते डोंबिवली ९० फीट रोड व ठाकुर्ली अशी ही सुविधा रविवारी प्रवाशांना देण्यात आली. मात्र रेल्वे स्थानकातील जलद गती मार्गावरील गाड्या सुरू असल्याने तसेच शहरात रिक्षा वाहतुकीचा पर्यायदेखील प्रवाशांकडे असल्याने केडीएमटी बसेसना हवा तसा प्रतिसाद लाभला नाही. दरम्यान, जलद गती मार्गावरील लोकल फेऱ्या सुरू असल्याने केडीएमटी बसला जास्त प्रतिसाद लाभला नाही, अशी माहिती केडीएमटी अधिकाऱ्यांनी देत याविषयी अधिक बोलणे टाळले.
दररोजच्या बसच्या वाहतुकीकडे जातीने लक्ष दिल्यास प्रवाशांना इतर वाहतुकीच्या साधनांकडे वळावे लागणार नाही. रिक्षाचालकांची मुजोरी पाहता केडीएमटीने पुढाकार घेतला, तरी त्यांना प्रवाशांची ६० टक्के साथ मिळेल. केडीएमटीच्या अधोगतीस वाहतूक कोंडीचे कारण सांगितले जात असले, तरी मुळात केडीएमटीकडे इच्छाशक्ती हवी.
- नकुल साठे, प्रवासी