वसईमधील वरुण कोविड सेंटरचा लिलाव होणार
शासनाने लिलावात उतरण्याची शिवसेनेची मागणी
विरार, ता. ४ (बातमीदार) ः वसई-विरारमधील वालीव येथील वरुण कोविड सेंटरचा लिलाव १८ जानेवारीला होणार आहे. याबाबतची जाहिरात कुलाबा येथील इंडियन बँकेच्या शाखेने प्रसिद्ध केली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा देण्यात येत असतानाच हा लिलाव होत आहे. त्यामुळे या लिलावात शासनाने उतरावे आणि ही जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सुसज्ज असे रुग्णालय उभारावे, अशी मागणी शिवसेनेचे नवघर-माणिकपूर शहरप्रमुख राजाराम बाबर यांनी शासनाकडे केली आहे. शिवसेना भवन येथे जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही बाब घातल्याचे त्यांनी सांगितले.
वसई तालुक्यात कार्डिनल हॉस्पिटल आणि संजीवनी हॉस्पिटल ही खासगी रुग्णालये सोडल्यास शासकीय असे एकही रुग्णालय नसल्याचा फटका पालिकेला बसला होता. पालिकेची छोटी छोटी रुग्णालये कोरोनासारख्या मोठ्या लाटेला थोपवू शकत नसल्याने पालिकेने आपल्या अधिकाराचा वापर करून वालीव येथील वरुण इंडस्ट्रीजची जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोविडसाठी ५०० खाटांचे रुग्णालय उभारले होते.
वरुणची ही जागा जवळपास सव्वातीन हेक्टर इतकी आहे. या जागेवर हेलिपॅडसह अनेक सुविधा आहेत. कारखान्याच्या व्यवस्थापनाने या जागेवर विविध ठिकाणांहून कर्ज घेतल्याने या जागेचा लिलाव करण्यात येणार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही जागा हॉस्पिटलला मिळाल्यास त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. त्यासाठी राजाराम बाबर हे खासदार, आमदार यांच्यासह शासनाकडे प्रयत्न करत आहेत.