९६ किलो प्लास्टिक जप्त
७० हजार रुपये दंड वसूल
कल्याण, ता. ५ (बातमीदार) ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सोमवार (ता. ३) ते रविवार (ता. ९) या काळात प्लास्टिक निर्मूलन सप्ताह कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवारी (ता. ४) पालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने केलेल्या कारवाईत सुमारे ९६ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. नियम मोडणाऱ्यांकडून सुमारे ७० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत १० प्रभाग क्षेत्र कार्यालये असून प्लास्टिकचा वापर करणाऱ्या फेरीवाला आणि दुकानदार यांच्याविरोधात घनकचरा विभागाने जोरदार कारवाई केली. या कारवाईत सुमारे ९६ किलो प्लास्टिक जप्त करत सुमारे ७० हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालिका घनकचरा विभाग उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली.
...तर पालिकेत प्रवेश नाही
सोमवारी आयोजित कार्यक्रमात प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेच्या सुरक्षा विभागप्रमुख उपायुक्त पल्लवी भागवत यांना सुमारे पाच हजार रुपये दंड करण्यात आला होता. त्यानंतर पालिकेतील कर्मचारी सतर्क झाले असून पालिकेतील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या हटवण्यात आल्या आहेत. शिवाय कर्मचारी अथवा नागरिक प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन पालिकेत येत असतील तर त्यांना प्रवेश नाकारला जातो आहे.
कल्याण ः पालिका घनकचरा विभाग कर्मचारी प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांकडून दंड वसूल करत आहेत.