उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत मद्य तस्कर ताब्यात
विदेशी मद्य आणि वाहनासह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
मनोर, ता. ५ ः उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी (ता. ५) पहाटे जव्हार तालुक्यातील पिंपळशेत-तलावली रोडवरील आकरे गावच्या हद्दीत कारवाई केली. यात २०० बल्क लिटर विदेशी मद्यासह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार असून तो विक्रोळी भेसळयुक्त दारू कांड प्रकरणात तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी पहाटे जव्हार तालुक्यातील आकरे गावच्या हद्दीत पिंपळशेत तलावली रोडवर भरारी पथकाकडून सापळा रचण्यात आला होता. या वेळी एका संशयित कारची एमएच ०२ सीआर १५१४ तपासणी केली असता कारमध्ये दादरा- नगर- हवेली, दीव-दमण बनावटीचे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. कार आणि २००.८८ बल्क लिटर विदेशी मद्य मिळून सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रमेश ज्ञानेश्वर पोखरकर आणि चंद्रकांत राम जाधव अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपीविरोधात महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना गुरुवारपर्यंत एक्साईज कस्टडी सुनावली आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. विठ्ठल भुकन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक शंकर सीताराम आंबेरकर, दुय्यम निरीक्षक पांडुरंग तुकाराम पडवळ, उदय अनंत शिंदे, जवान भाऊसाहेब कराड, देविदास सोमवंशी, संदीप पवार, प्रशांत निकुंभ, अनिल पाटील यांनी प्रत्यक्ष भाग घेतला होता.