करचुकवेगिरीच्या आरोपावरून
‘क्षिओमी इंडिया’ला नोटिसा
नवी दिल्ली, ता. ५ ः आयात कर चुकवेगिरीच्या आरोपावरून ‘क्षिओमी’ या मोबाईल निर्माती चिनी कंपनीच्या भारतीय युनिटला ६५३ कोटी रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. करारातील बंधनकारक अटींनुसार ‘क्षिओमी’ने अमेरिका आणि चीनमधील उत्पादक कंपन्यांना दिलेल्या शुल्काचा उल्लेख कागदपत्रांमध्ये न केल्याचे केंद्राच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हटले आहे.
या प्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाकडून (डीआरआय) ‘क्षिओमी इंडिया’ला तीन कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. ‘क्षिओमी इंडिया’च्या काही ठिकाणांवर ‘डीआरआय’ने नुकताच छापा टाकला. या वेळी हाती लागलेल्या काही कागदपत्रांमध्ये ही बाब निदर्शनास आल्याचे ‘डीआरआय’ने बुधवारी सांगितले.
या प्रकरणी ‘क्षिओमी इंडिया’ने दिलेल्या स्पष्टीकरणात, ‘डीआरआय’ने बजावलेल्या नोटिशींचे तपशीलवार विश्लेषण सुरू असल्याचे सांगितले. भारतीय कायद्यांचा आम्ही पूर्ण आदर करतो. त्यांचे पालन करण्यास प्राधान्य दिले आहे. यासंदर्भातील जी काही कागदपत्रे आवश्यक असतील त्यांची पूर्तता करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे ‘क्षिओमी इंडिया’च्या प्रवक्त्याने सांगितले.
...