खारघर-तळोजात दहा हजार घरांचे बांधकाम
सिडकोकडून खारघर रेल्वेस्थानकालगत मोठी घरे
खारघर, ता. ६ (बातमीदार) : सिडकोकडून खारघर आणि तळोजा परिसरात दहा हजारांहून अधिक घरांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. खारघर रेल्वेस्थानक परिसरात टू बीएचकेच्या २०४० घरांचे बांधकाम सुरू आहे. सदर घरे खाडी किनारी असल्याने या घराला अधिक मागणी असून त्याप्रमाणे दर असल्याची शक्यता आहे.
सिडकोच्या वतीने घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकरिता घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे चोवीस हजार घरांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सिडकोने आतापर्यंत अनेक गृहनिर्माण योजना राबवल्या आहेत. ''परवडणारी घरे'' या संकल्पनेनुसार सिडकोने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी योजना राबवली असून त्यातून अनेकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करता आले आहे.
आता नवीन वर्षात सिडकोच्या वतीने महागृहनिर्माण योजना राबवली जाणार आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात पाच हजार घरांची लॉटरी काढली जाणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले होते. खारघर सेक्टर एक रेल्वे स्थानकालगत, सेक्टर १४ खारघर गाव मेट्रो स्थानकाजवळ असलेल्या भूखंडावर ही गृहसंकुले उभारली जात आहे. या भूखंडावर तळ मजल्यावर बस टर्मिनल असून वर निवासी घरे आहेत. तसेच सेक्टर अठरा डी मार्टसमोर आणि तळोजा सेक्टर ३९ आदी भागांत सिडकोकडून घरांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
खारघरमध्ये गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचा ठेका कॅपासाईट इन्फ्राप्रोजेक्ट्स तर तळोजा आणि द्रोणागिरीत एल अँड टीला देण्यात आले आहे. तळोजा सेक्टर ३९ हा परिसर मुंब्रा-पनवेल महामार्गालगत आहे. या घरांचे बांधकाम काँक्रिटचे असल्यामुळे येथील घरांना अधिक मागणी असणार आहे; तर खारघर सेक्टर १ अ खारघर रेल्वेस्थानकापासून पन्नास मीटर अंतरावर टूबीएचके घरे उभारली जात आहे.
खारघर रेल्वेस्थानकाशेजारी पंधरा मजल्यांच्या एकूण सतरा इमारती उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक मजल्यावर आठ टू बीएचके घरे असतील. याबाबत सिडको अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, खारघर आणि तळोजामध्ये जवळपास दहा हजार घरे आहेत. त्यात नगरविकास मंत्र्यांनी पाच हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असल्याचे समाजमाध्यमांवर ट्विट केल्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
खारघरमधील घरांना पसंती
- खारघर रेल्वेस्थानकालगत उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्प खाडी किनारा आहे. त्यामुळे थंड वातावरण, तसेच इमारतीच्या छत आणि गच्चीवरून समुद्रातील भरती ओहोटीचा आनंद घेता येणार आहे.
- खाडीच्या दुसऱ्या भागाला नवी मुंबई विमानतळ आहे. या गृहप्रकल्पाला लागून खारघर-बेलापूर कोस्टल रोड होणार आहे. खारघरवरून कोस्टल रोडमार्गे बेलापूर, मुंबई तसेच नवी मुंबई विमानतळ गाठणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे सिडकोकडून उच्च वर्गीयांसाठी या ठिकाणी टूबीएचकेचा गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात असावे, अशी चर्चा सुरू आहे.
- खारघर गाव, मेट्रो स्थानकाच्या दोन्ही बाजूला सिडकोच्या नवीन घरांचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पालगत बस टर्मिनल, मेट्रो स्थानक, डी मार्ट तसेच इतरही काही शोरूम आहे. त्यामुळे खारघरमधील घरांना अधिक पसंती असणार आहे.