सांस्कृतिक कट्ट्यांवर पुन्हा शुकशुकाट
कोरोना निर्बंधांचा फटका; आयोजकांकडून ऑनलाईन कार्यक्रम
ठाणे, ता. ६ (बातमीदार) : जानेवारीच्या सुरुवातीपासून कोरोना आणि ओमिक्रॉनचा संसर्ग ठाणे शहरात झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ इत्यादींच्या उपस्थितीवर निर्बंध घातले आहेत. तेव्हा ठाणेकरांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणाऱ्या सांस्कृतिक कट्ट्यांच्या आयोजकांना प्रत्यक्ष नियोजित केलेले कार्यक्रम पुन्हा ऑनलाईन घेण्याची वेळ आली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमात केवळ ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी आहे. शंभराहून अधिक प्रेक्षक उपस्थिती असणाऱ्या कट्ट्यांवर निर्बंध आल्यामुळे काही आयोजकांनी नियोजित कार्यक्रम रद्द केले असून तर काहींनी पुन्हा ऑनलाईन माध्यमातून कट्टे भरविण्यास प्राधान्य दिले आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सुप्रसिद्ध अशा अभिनय कट्ट्यावर दर रविवारी होणाऱ्या एकांकिका, नाटके इत्यादी मोजक्या कलाकारांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष करून त्याचे थेट प्रसारण ऑनलाईन माध्यमातून केले जाणार आहे. आचार्य अत्रे कट्ट्यावर २९ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष संगीत मैफलीचे नियोजन करण्यात आले होते; परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी परवानगी नाकारण्यात आल्यामुळे आयोजकांनी कार्यक्रम रद्द करत गडकिल्ल्यांचा इतिहास या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केले. ५० हून अधिक लोकांच्या उपस्थितीवर निर्बंध असल्याने ब्रह्मांड कट्ट्याचेही पुढील सर्व कार्यक्रम पुन्हा ऑनलाईन माध्यमातून घेण्याचे आयोजकांनी ठरवले आहे; तर विवेकानंदांच्या जन्म तिथीचे औचित्य साधून कुसुमाग्रज कट्ट्यावर आयोजित केलेला प्रबोधनात्मक कार्यक्रमही रद्द केले असल्याचे कट्ट्याच्या आयोजकांनी सांगितले.
२९ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष कट्ट्यावर संगीत मैफलीचे आयोजन होणार होते. मात्र पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने कार्यक्रमाला परवानगी मिळाली नाही. तेव्हा कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत पुढील सर्व कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून घेणार आहोत.
- शीला वागळे, आचार्य अत्रे कट्टा.
निर्बंधांमुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. तेव्हा कोरोना नियमांचे पालन करून किमान प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीच्या कलाकारांना प्रत्यक्ष सादरीकरणाची संधी देऊन त्याचे प्रसारण ऑनलाईन माध्यमातून करण्याचा प्रयत्न असेल.
- किरण नाकती, संचालक, अभिनय कट्टा.
ऑनलाईन कट्ट्याचे आयोजन करायचे झाल्यास आमच्याकडे पुरेशी यंत्रणा आणि तंत्रज्ञ उपलब्ध नाहीत. तेव्हा कोरोनाचा वाढता संसर्ग आणि निर्बंध पाहून आम्ही कट्टा काही कालावधीसाठी बंद करीत आहोत.
- पुष्पा नाईक, कुसुमाग्रज कट्टा.