कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका ‘ऑन फिल्ड’
तीन हात नाक्यावरील गर्दुल्ल्यांना हुसकावले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने ‘ऑन फिल्ड स्वच्छता मोहीम’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील गजबजलेले ठिकाण असलेल्या तीन हात नाक्यावर ठाण मांडून बसलेले गर्दुल्ले, भिकारी, विक्रेते यांना तेथून हुसकावून लावले आहे. या सर्वांमुळे अस्वच्छता पसरून ठाणे शहराला डाग लागला होता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या अस्वच्छतेविरोधात शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी पालिका महासभेत आवाज उठवला होता. त्यानुसार पालिकेने स्वच्छतेवर भर देत ही कारवाई केली.
मुंबईहून ठाण्यात येणाऱ्यांचे तीनहात नाक्यावरूनच आगमन होते; परंतु या नाक्यावरील अस्वच्छतेने ठाणे महापालिकेवर एकप्रकारे डाग लागला होता. शहरातील नेहमी गजबजलेला चौक म्हणून तीन हात नाक्याकडे पाहिले जाते. आनंदनगर असो वा मॉडेल चेक नाका येथून ठाण्यात आल्यावर प्रामुख्याने हा चौक पहिल्यांदा लागतो. त्यामुळे मुंबईतून ठाण्यात आल्यावर तीन हात नाका परिसरात उड्डाणपूल, गुरुद्वारासमोरील व इटर्निटी मॉलजवळील सर्व्हिस रोड परिसरात ठाण मांडून बसणाऱ्या भिकारी, गर्दुल्ले व विक्रेत्यांमुळे अस्वच्छता पसरत होती.
डिसेंबर महिन्यातील महासभेत यासंदर्भात शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी आवाज उठवून तो परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली होती. त्या वेळी प्रभारी आयुक्त संदीप माळवी यांनी स्वतः लक्ष घालून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार बुधवारी (ता. ५) नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांच्या पथकाने स्वच्छता मोहीम हाती घेत भिकारी, गर्दुल्ले व विक्रेत्यांना हुसकावून लावले आणि परिसर स्वच्छ केला.
तीन हात नाक्यावरील अस्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी येत होत्या. त्यातच येथील अस्वच्छता शहरात एक डाग लावत होती. त्यासंदर्भात महासभेत विषय चर्चेला आणला. त्यानुसारच हा परिसर स्वच्छ झाला असून तो असाच स्वच्छ राहील, याची जबाबदारी पालिका प्रशासनाने घ्यावी.
- विकास रेपाळे, नगरसेवक, ठाणे