मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी
मागील १६ दिवसांत एकाचाही मृत्यू नाही
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : काही दिवसांपासून मुंबईत कोरोना संसर्ग वेगाने वाढत असला, तरी मुले कमी प्रमाणात बाधित आढळत आहेत. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या १६ दिवसांत ० ते ९ वयोगटातील संक्रमित मुलांच्या संख्येत ५ टक्के आणि १० ते १९ वयोगटातील संक्रमित मुलांच्या संख्येत केवळ ८ टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच आता वेगाने वाढणाऱ्या कोविड संसर्गाचा लहान मुलांवर कमी परिणाम होत आहे. १६ दिवसांत एकाही मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.
मुंबईत ३ जानेवारीपर्यंत आठ लाख १८ हजार ४६२ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात ० ते १९ वयोगटातील ५६ हजार ७३३ मुलांचा समावेश आहे. म्हणजेच एकूण बाधितांपैकी आठ टक्के बालकांचा त्यात समावेश आहे. मुंबईत १९ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान १० ते १९ वयोगटातील ३,१४१ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. म्हणजेच १६ दिवसांत दररोज १९६ मुले बाधित झाली आहेत. याच कालावधीत ० ते ९ वयोगटातील ७९५ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. म्हणजेच गेल्या १६ दिवसांत दररोज या वयोगटातील ४९ मुलांना संसर्ग झाला आहे.
बालरोग कोविड टास्क फोर्सचे सदस्य आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. बकुल पारेख म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करील. प्रौढांची संख्या वाढल्यास मुलांची संख्याही त्याच प्रमाणात वाढेल; परंतु सध्या मुलांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण नगण्य आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. फक्त कुटुंबातील सदस्यांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे. गर्दीत जास्त फिरू नये. कारण घरातील मोठ्या व्यक्ती जास्त प्रमाणात घराबाहेर गेल्यास त्यांच्यापासून मुलांना संसर्ग होण्याचा धोका असतो. मुलांना शक्यतो पार्क आणि गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
केईएम रुग्णालयाच्या बालरोग विभागाचे प्रमुख डाॅ. मुकेश अग्रवाल यांनी सांगितले की, मुलांमध्ये संसर्गाची तीव्रता खूप कमी आहे. त्यामुळे त्यांना सध्या आयसीयू व आॅक्सिजनची गरज नसल्याचे दिसत आहे. आता बाधित मुलांमध्ये केवळ तापाची तक्रार असून ते सामान्य औषधांनीही बरे होत आहेत.
प्रमुख रुग्णालयांमध्ये ५० खाटा राखीव
सध्या महापालिकेच्या सायन, केईएम, नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमध्ये मुलांसाठी ५० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सध्या अनेक खाटा रिकाम्या आहेत. संक्रमित मुलांची संख्याही कमी आहे, असे पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.