पदवी-पदव्युत्तरच्या
ऑनलाईन परीक्षेसाठी
विद्यापीठाची तयारी सुरू
मुंबई, ता. ६ : ओमिक्रॉन आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठ आणि संलग्न सर्व वरिष्ठ महाविद्यालये आजपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहेत. त्यामुळे विद्यापीठाने आपल्याकडील हिवाळी सत्राच्या परीक्षाही ऑनलाईन घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
विद्यापीठात सध्या हिवाळी सत्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन त्या आजपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत. १४ जानेवारीपासून विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान आणि इतर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी, पदव्युत्तर, पदविका आदींच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्या २८ जानेवारीपर्यंत चालणार असून आॅनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली.
पदवीच्या प्रथम वर्षासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसत असतात. यंदा मुंबई आणि परिसरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील नेट व इतर सुविधा आदींचा विचार करून त्यासाठीचे वेळापत्रक तयार केले जात आल्याची माहितीही विद्यापीठाकडून देण्यात आली.