चर्चगेट येथे १० टॅक्सींवर ताडदेव आरटीओची कारवाई
‘सकाळ’च्या बातमीची अधिकाऱ्यांकडून दखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : चर्चगेट रेल्वेस्थानकावरून गेट वे आॅफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि इच्छित ठिकाणी धावणाऱ्या अवैध टॅक्सीतून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर ताडदेव आरटीओ कार्यालयाने धडक कारवाई केली. शिवाय वाहतूक पोलिस विभागाने वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली आहे. चर्चगेट रेल्वेस्थानकाबाहेरील टॅक्सीचालक वाहतूक नियमांना धाब्यावर बसवून, मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक न करता मनमानी भाडे आकारत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने ३१ डिसेंबरला प्रकाशित केले होते. त्यानंतर ताडदेव आरटीओ अधिकारी भारत कळसकर यांच्या सूचनेवरून १० टॅक्सींवर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बॅच नसणाऱ्या, कागदपत्र आणि लायसन्स नसलेल्या टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात आली असून यातील एक टॅक्सी जप्तसुद्धा करण्यात आल्याचे ताडदेव आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी व सायंकाळी पीकअवर्समध्ये प्रवाशांची आर्थिक लूट टॅक्सीचालक करत असल्याचा भांडाफोड ‘सकाळ’ने केला होता. ज्यामध्ये सीएसएमटी आणि इतर ठिकाणी पोहचण्यासाठी तब्बल ८० रुपयांपेक्षा जास्त भाड्याची मनमानी मागणी केली जात असल्याचेही उघड केले होते. यामध्ये टॅक्सी चालक संगनमत करून सर्वसामान्य प्रवाशांची लूट करत असून, वाहतुकीच्या नियमांना टॅक्सीचालक कसे धाब्यावर बसवत आहेत ते उघड केले होते. त्यानंतर आता वाहतूक पोलिस विभाग आणि ताडदेव आरटीओ कार्यालयाने दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे.
...
१० टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात आली. ज्यांच्याकडे कागदपत्रे, बॅच आणि लायसन्स नाही अशा टॅक्सीचालकांचा त्यामध्ये समावेश आहे. भविष्यात अशा मुजोर टॅक्सीचालकांवर कारवाईची मोहीमच हाती घेण्यात येणार आहे.
- भारत कळसकर, आरटीओ अधिकारी, ताडदेव.
...