सासूवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या
जावयाला अटकपूर्व जामीन मंजूर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : सासूवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या आरोपी जावयाला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
उल्हासनगर येथील पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे आपल्या मुलीच्या लग्नाआधी आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीमध्ये केला आहे. मुलीच्या लग्नाआधी हा गुन्हा घडला होता, तर मुलीचे लग्न आरोपीशी का लावले, असा प्रश्न न्यायालयात सुनावणीमध्ये उपस्थित केला. आरोपी आणि मुलीचा घटस्फोटाचा घटला सुरू आहे. त्यामुळे सासूची फिर्याद आरोपीवर दबाव टाकण्यासाठी आहे, असा युक्तिवाद आरोपीकडून करण्यात आला. न्या. सारंग कोतवाल यांनी दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून आरोपीला तीस हजारांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.