जीवरक्षक कंत्राटाला मुदतवाढ
नव्या कंत्राटदाराच्या नियुक्तीला विलंब
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : समुद्र किनाऱ्यावर नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी जीवरक्षकांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नव्या कंत्राटदाराची नियुक्ती होण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तीन महिन्यांसाठी ५५ लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे.
मुंबईतील किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक तैनात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार समुद्र किनाऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार तसेच तेथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येनुसार महापालिकेने प्रत्येक किनाऱ्यावर जीवरक्षक तैनात केले आहेत. २०१९ मध्ये ही नियुक्ती करण्यात असून डिसेंबर २०२१ मध्ये या कंत्राटाची मुदत संपली आहे. मात्र, नव्या जीवरक्षकांच्या नियुक्तीसाठी निविदा मागवल्या असून १५ जानेवारीपर्यंत या निविदा प्राप्त होणार आहे. त्यानंतर नियुक्तीची प्रक्रिया करण्यात येणार असल्याने सध्या तैनात असलेल्या जीवरक्षकांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसा प्रस्ताव आगामी आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. या सर्व किनाऱ्यांवर जीवरक्षक पुरविण्याची जबाबदारी दृष्टी लाइफ सेव्हिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर सोपविण्यात आली आहे. या कंपनीला आता तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
चौकट
समुद्रकिनारा जीवरक्षक तीन वर्षांसाठी खर्च तीन महिन्यांसाठी खर्च
गोराई १८ २ कोटी ५१ लाख १० लाख ४८ हजार
दादर गिरगाव २७ ३ कोटी ८९ लाख १६ लाख २१ हजार
वर्सोवा, जुहू, आस्का ४८ ६ कोटी ६८ लाख २७ लाख ८७ हजार